Pune Rain: दुपारच्या उकाड्यापासून सुटका; विजांच्या कडकडाटासह पुण्यात वरूणराजा बरसला
By श्रीकिशन काळे | Updated: June 1, 2023 17:26 IST2023-06-01T17:26:19+5:302023-06-01T17:26:29+5:30
दोन-तीन दिवसही दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अनुभव पुणेकरांना येणार

Pune Rain: दुपारच्या उकाड्यापासून सुटका; विजांच्या कडकडाटासह पुण्यात वरूणराजा बरसला
पुणे : शहरात दुपारी निरभ्र आकाश होते. प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. हलक्या त्या जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. येत्या दोन-तीन दिवसही दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अनुभव पुणेकरांना येईल असेही हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरूवारी (दि. १) अरबी समुद्रात दाखल झाला आहे. दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि कोमोरीन भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. दरवर्षी १ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असतो. यंदा मात्र मॉन्सून लांबला आहे. तो रविवारपर्यंत (दि. ४) मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मॉन्सून १९ मे रोजी दक्षि बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला. त्यानंतर काही काळ मॉन्सून थंडावला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.३०) अंदमान, निकोरबार बेटसमूह आणि अंदमान समुद्रासह पूर्व मध्य बंगालच्या उपसागाराच्या काही भागात मॉन्सून आला. आज (दि.१) मॉन्सूनने अरबी समुद्रात शिरकाव केला आहे. शनिवारपर्यंत (दि.३) अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून येऊ शकतो.