स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला दिलासा; दरमहा ३० हजार रुपये पोटगी देण्याचे पतीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:41 IST2026-04-05T13:40:20+5:302026-04-05T13:41:27+5:30

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. दैनंदिन खर्चासाठी पतीने पत्नीला दरमहा ३० हजार रुपये ...

Relief for wife preparing for competitive exam; Husband ordered to pay alimony of Rs 30,000 per month | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला दिलासा; दरमहा ३० हजार रुपये पोटगी देण्याचे पतीला आदेश

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला दिलासा; दरमहा ३० हजार रुपये पोटगी देण्याचे पतीला आदेश

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. दैनंदिन खर्चासाठी पतीने पत्नीला दरमहा ३० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. खान यांनी नुकताच दिला आहे.

या प्रकरणात पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद व कौटुंबिक वादामुळे विभक्त राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर पत्नीने पोटगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते की, ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, तिच्याकडे कोणतेही स्वतंत्र उत्पन्न नाही. राहणीमान, अभ्यास साहित्य, फी आणि इतर दैनंदिन खर्च भागविणे कठीण जात असल्याने पतीकडून आर्थिक सहाय देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिने केली होती. तसेच पतीकडून आवश्यक खर्चासाठी पुरेशी मदत मिळत नसल्याचेही तिने अर्जात नमूद केले होते. पत्नीने ॲड. सोनाली आरू-नवस्कर, ॲड. प्राची जमदाडे-कोल्हे, ॲड. अजय मोहेळ आणि दीपाली अडसूळ यांच्यामार्फत हा अर्ज केला होता.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने पतीचे उत्पन्न, पत्नीची शैक्षणिक, आर्थिक गरज आणि तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत दरमहा ३० हजार रुपये पोटगी मंजूर केली. ही रक्कम पत्नीच्या शिक्षणासह तिच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

 

Web Title: Relief for wife preparing for competitive exam; Husband ordered to pay alimony of Rs 30,000 per month