पुणेकरांना दिलासा..! जीबीएस रुग्णांसाठी मोफत इंजेक्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:48 IST2025-01-28T09:47:44+5:302025-01-28T09:48:20+5:30
GBS Outbreak: ‘जीबीएस’ची पुण्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक

पुणेकरांना दिलासा..! जीबीएस रुग्णांसाठी मोफत इंजेक्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध
पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (Guillain-Barre Syndrome) च्या रुग्णावर महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. या आजाराच्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
‘जीबीएस’ची पुण्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने महापालिकेने पुणेकरांना उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे निर्णय घेतले आहेत. ‘जीबीएस’वर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.
खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी मदत केली जाईल. याचबराेबर खासगी अथवा कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जीबीएस रुग्णांना ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुण्यात ‘जीबीएस’चे रुग्ण आढळत आहेत. त्यासंदर्भात पालिका खबरदारी घेत आहे. परंतु यावरील उपचार महाग आहेत. त्यामुळे महापालिकेने पुणेकरांना उपचारांसाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना आयुक्तांना केली होती.
बाधित सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी
नांदेड, किरकटवाडी या भागातील बांधित सोसायट्यांना पुणे महापालिका पिण्याच्या पाण्याचा टॅंकर देणार आहे. त्यात डीएसके विश्व, उत्सव, मोरया स्पर्श, पांडुरंग रेसिडेन्सी, होम फेज २, अर्बन पार्क, कमल ग्रीन लीफ, आनंदबन, इंगवले पाटील कॉम्प्लेक्स, उज्ज्वल निसर्ग सोसायटी, साई गॅलेक्सी या सोसायट्यांचा समावेश आहे.