वारजे : वारजेतील महामार्ग परिसराच्या सेवा रस्त्यावर एका मसाज पार्लरवर वारजे पोलिसांनी टाकलेली रेड संशयास्पद आहे. एका नागरिकाने या मसाज पार्लर बाबत टीप देऊनही पोलिसांना काहीच आक्षेपार्ह न आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्याचे झाले असे, मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास वारजे पोलिसांचे दोन निरीक्षक, दोन अधिकारी, महिला कर्मचारीसह एक पथक वारजेच्या महामार्ग परिसरातील एका इमारतीत चालू असलेल्या मसाज पार्लरमध्ये पोहोचले. पोलिसांनी त्या ठिकाणी सुमारे अर्धा तास झाडाझडती करून तेथे काम करत असलेल्या चार-पाच महिला आणि दोन पुरुषांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे सुमारे तीन तास चौकशी करूनही पोलिसांना आक्षेपार्ह काहीही सापडले नाही, हे विशेष आहे.
दरम्यान, ज्या नागरिकाने पोलिसांना अशा ठिकाणी अवैध प्रकार चालत असल्याबाबतची माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे शॉप ॲक्ट लायसन्स सोडून मसाज पार्लर किंवा सलूनचाही कसलाही परवाना नाही, तसेच मसाज करण्यासाठी वेगवेगळ्या पार्टिशनच्या खोल्या असण्याची गरज काय, असा सवाल व्यक्त होतो. दरम्यान, वारजे पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नीलेश बडाख यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची विस्तृत चौकशी केली. मात्र, त्यात काही आक्षेपार्ह न आढळल्याने गुन्हा दाखल केला नाही.
डॉक्टरमुळे गुन्हा दाखल नाही?
दरम्यान, ज्यावेळेस पोलिसांनी येथे रेड मारली, त्यावेळेस वारजेतील एक नामांकित गायनॅक डॉक्टर त्या ठिकाणी ग्राहक म्हणून आत हजर होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना वाचविण्यासाठी पार्लरवर काहीच कारवाई केली नाही, अशी ही चर्चा या ठिकाणी रंगली होती.
रेड फेल का?
हे पार्लर मागील अनेक वर्षे या भागात आहे, याशिवाय वारजेत अजून चार-पाच पार्लरही आहेत. संबंधित व्यक्तीने पोलिसांना दोन दिवस आधीच या ठिकाणी टीप दिली होती. असे असूनही पोलीस किंवा संबंधित व्यक्ती या दोनपैकी एका बाजूकडून या व्यावसायिकाला खबर लागली असल्यानेच काहीच संशयास्पद न आढळून ही टिप फेल गेली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.