रवींद्र धंगेकर हाजीर हो...! समीर पाटील आरोप प्रकरणात न्यायालयाकडून समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:03 IST2025-10-29T11:02:09+5:302025-10-29T11:03:21+5:30
धंगेकर यांनी घायवळ प्रकरणात बोलताना समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता

रवींद्र धंगेकर हाजीर हो...! समीर पाटील आरोप प्रकरणात न्यायालयाकडून समन्स
पुणे : पुण्याच्या सत्र न्यायालयाने काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना समन्स बजावले असून, न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांनी धंगेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने धंगेकर यांना न्यायालयात ‘हाजीर हो’ चे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नीलेश घायवळचे आणि चंद्रकांत पाटील यांचे जवळचे संबंध असून, त्यांच्याच पाठबळामुळे घायवळ गँग पुण्यात दहशत माजवत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तसेच, या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावरही धंगेंकरांनी आरोप केले होते. त्यामुळे, समीर पाटील आणि धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. ही लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात बोलताना धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी पुरावे म्हणून काही फोटो आणि माहिती समोर आणली होती. मात्र, या आरोपांचा कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचा दावा करत समीर पाटील यांनी धंगेकरांचे आरोप हे राजकीय स्वार्थापोटी केल्याचे सांगितले होते. तसेच धंगेकर यांच्या या टीकेमुळे समीर पाटील यांच्या व्यवसायिक प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले होते.