धक्कादायक! पुण्यात अभिनेत्रीवर बलात्कार; ब्ल्यू फिल्म बनविण्याची धमकी देत मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 15:38 IST2021-12-18T15:14:46+5:302021-12-18T15:38:46+5:30
फिर्यादीचे फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली.

धक्कादायक! पुण्यात अभिनेत्रीवर बलात्कार; ब्ल्यू फिल्म बनविण्याची धमकी देत मागितली खंडणी
पुणे: अभिनेत्रीबरोबर वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून त्याच्या एकांतातील फोटो व्हायरल करण्याची व ब्ल्यु फिल्म बनविण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी बॉलिवूडमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटचा राजेश माल्या, अभिजित गणपत साठे (वय ३४, रा. वारजे) व त्याची औंध येथील बहिण अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी हडपसर येथील एका २५ वर्षाच्या तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०१७ पासून २१ जुलै २०२१ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी काही लघुपटात तसेच मॉडेल म्हणून कामे केली आहेत. त्यातून तिची अभिजित साठे याच्याबरोबर ओळख झाली होती. साठे याने फिर्यादीसोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यांच्या दोघांच्या एकांतातील फोटो व्हायरल करण्याची व ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी दिली. साठे याने फिर्यादीबरोबर शरीर संबंध ठेवले व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीस चित्रपटात काम देतो, फोटो शुट कंपनी काढु इत्यादी भुलथापा देऊन फिर्यादीकडून ६ लाख ४१ हजार रुपये घेऊन पैशांचा अपहार केला.
फिर्यादीचे फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यात एका वकिलांनी तडजोड करण्यासाठी जबरदस्तीने ब्लॅकमेल करुन नोटरी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश माल्या यांची मुंबईत मेसर्स बॉलीवूड फिल्म इक्विपमेंट ही चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटिंगचे साहित्य भाड्याने पुरविणारी सर्वात मोठी कंपनी आहे. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.