rakhi for solider deployed in jammu- kashnir ; initiative by amhi punekar organisation | जम्मू- काश्मिरमधील जवानांसाठी अनाेख्या राख्या ; आम्ही पुणेकर संस्थेचा उपक्रम
जम्मू- काश्मिरमधील जवानांसाठी अनाेख्या राख्या ; आम्ही पुणेकर संस्थेचा उपक्रम

पुणे : जम्मू- काश्मिरमधील सैनिकांकरीता खास तयार करण्यात आलेल्या चाॅकलेटच्या राख्या पुण्यातून पाठविण्यात आल्या.  हम सब एक है चा संदेश देत आम्ही पुणेकर संस्था जम्मू-काश्मिरमधील विविध भागांत रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. त्या भाईचारा दिनाचा शुभारंभ पुण्यातून चॉकलेटच्या राख्यांच्या पूजनाने झाला.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने जनरल झोरावर सिंग ट्रस्ट जम्मू व मूर्तीज् पद्मसुंदर बेकरीच्या सहकार्याने पुण्यातून जम्मू-काश्मिरमधील सैनिकांकरीता चॉकलेटच्या राख्या पाठविण्यात येत आहेत. त्या राख्यांचे पूजन सोमवार पेठेतील सुयश हॉटेलसमोर असलेल्या पद्मसुंदर बेकरी येथे झालेल्या कार्यक्रमात दृष्टीहिन मुले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
  
यावेळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, शारदा ज्ञानपीठाचे पं.वसंतराव गाडगीळ, पद्मसुंदर बेकरीचे विक्रम मूर्ती, उषा मूर्ती, हँडिकॅप हेल्पर फाऊंडेशनचे संचालक प्रविण राठी, कार्याध्यक्ष रामदास लढे आदी उपस्थित होते. आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, अखिल झांजले, समीर देसाई, संतोष फुटक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. हँडिकॅप हेल्पर फाऊंडेशनमधील दृष्टीहिन मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. 

दिलीप देशमुख म्हणाले, सिमेवरील जवानांमुळे आपण आपल्या शहरांमध्ये सुखाने राहू शकतो. सैनिक आपल्या येथे येऊ शकत नाहीत आणि आपण देखील सिमेवर त्यांना भेटण्याकरीता जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपले प्रेम व पाठिंवा राख्यांच्या माध्यमातून पाठवित आहोत. 

पं.वसंतराव गाडगीळ म्हणाले, देशाच्या सिमेवरील वातावरण अनेकदा तणावपूर्ण असते. सध्या संसदेमध्ये संमत झालेल्या ३७० कलमामुळे देखील तेथे तणावपूर्ण शांतता आहे. त्यात आपण पुणेकरांनी सैनिकांना राख्या पाठविल्यामुळे आपले प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दिव्यांग मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. 

हेमंत जाधव म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील सांबा सेक्टर, डोडा, रियासीसह विविध भागांतील सैनिकांना या राख्या आम्ही बांधणार आहोत. नेहमीच्या राख्यांपेक्षा चॉकलेटच्या राख्या यंदा जवानांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाकरीता अनेक संस्थांनी सहकार्य केले असून जम्मू काश्मिरमधील सामाजिक संस्था देखील सहभागी होणार आहेत. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनी हे कार्यक्रम सैनिकांसोबत पुणेकर साजरे करणार आहेत.  


Web Title: rakhi for solider deployed in jammu- kashnir ; initiative by amhi punekar organisation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.