Raj Thackeray: वसंत मोरेंच्या शिलेदाराचा मनसेला राम-राम; पण राज ठाकरेंच्या वाढदिवशी 'तात्यां'चा मोठा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 10:53 IST2022-06-07T10:33:34+5:302022-06-07T10:53:38+5:30
वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांबाबत सातत्यानं नाराजी आणि खदखद व्यक्त करत आहेत.

Raj Thackeray: वसंत मोरेंच्या शिलेदाराचा मनसेला राम-राम; पण राज ठाकरेंच्या वाढदिवशी 'तात्यां'चा मोठा प्लॅन
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या प्रश्नावरुन पुकारलेल्या आंदोलनाविरोधात सूर आळवल्यानंतर वसंत मोरे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करत पुणे शहर अध्यक्ष पदावरुन त्यांना हटविण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाली. पण आपण कट्टर मनसैनिक असून राज ठाकरेंच्या विचारांशी बांधील असल्याचं मोरेंनी सांगितलं. मात्र, आता वसंत मोरेंचे शिलेदार असलेल्या निलेश माझिरे यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. तर, दुसरीकडे वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या वाढदिनी मोठा कार्यक्रम आयोजिला आहे.
वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांबाबत सातत्यानं नाराजी आणि खदखद व्यक्त करत आहेत. पक्षात डावललं जात असल्याचा आरोपही मोरे यांनी केला आहे. मात्र, राज ठाकरेंवरील त्यांचं प्रेमही ते सातत्याने जाहीर करतात. मोरे यांची काही कार्यक्रमांना अनुपस्थिती आणि त्यातून चव्हाट्यावर आलेली खदखद उघड आहे. त्यातच आता मोरेंचे कट्टर समर्थक आणि मनसेच्या माथाडी सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझिरे यांनी पक्ष सोडल्याने चर्चेला उधाण आलं आहे. दुसरीकडे वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या वाढदिनी मोठ्या कार्यक्रमाचा प्लॅन आखला आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 12 जून रोजी सकाळी 10 वाजता मनसेच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेकडो तरुणांना मोफत नोकऱ्या देण्यात येणार असल्याचं वसंत मोरेंनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितलंय. तसेच, केवळ प्रभाग क्रमांक 56, 57, आणि 58 मधील मनसेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
माझिरेंचे बाबर यांच्यावर आरोप
दरम्यान, माझिरे यांनी पक्ष सोडताना मनसेतील दोन नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या होत्या. मात्र, याबद्दल माझिरेंनी अद्याप स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. मी पक्ष सोडण्याचं मुख्य कारण हे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.