कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून ’राजधर्माचे’ पालन नाहीच : अर्जुन डांगळे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 08:33 PM2018-11-14T20:33:31+5:302018-11-14T20:38:56+5:30

भारतीय जनता पार्टीकडून एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो.

'Raj Dharma' is not followed by Chief Minister in Koregaon : Arjun Dangle | कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून ’राजधर्माचे’ पालन नाहीच : अर्जुन डांगळे यांचा आरोप

कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून ’राजधर्माचे’ पालन नाहीच : अर्जुन डांगळे यांचा आरोप

Next
ठळक मुद्देकोरेगाव भीमा हिंसाचार आणि भाजप विरोधात करण्यात येणारी दलित आघाडी याविषयी पुण्यात बैठकमराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका

पुणे :  परदेशात गेले की पंतप्रधान आपण गौतम बुध्दांच्या देशातुन आल्याचे सांगतात.सोयीनुसार महात्मा गांधींच्या विचारांचे दाखले देत सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्त्न पक्षातील नेते करतात. त्यांना विदेशात मात्र गोळवलकर आणि हेडगेवारांचे नाव घेण्याची हिंमत होत नाही. एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातो. गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचारांवर वाढ झालेल्या भारतीय जनता पार्टी पुढे नेमका आदर्श कुणाचा आहे? असा सवाल रिपब्लिकन जनता पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी उपस्थित केला. तसेच कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून  ‘‘राजधर्माचे’’ पालन झाले नसून त्यात त्यांची पेशवाई वृत्ती दिसून आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 
 कोरेगाव भीमा हिंसाचार आणि भाजप विरोधात करण्यात येणारी दलित आघाडी याविषयी पुण्यात बैठक पार पडली. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. यात सुनील पगारे, अरविंद नागटिळक, शंकर वाघमारे, दयानंद बनसोडे, हिरालाल भोसले, आशुतोष भोसले यांचा सहभाग होता. कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भिडे आणि एकबोटे यांना पाठीशी घातल्याचा आरोप डांगळे यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता भानामतीचा खेळ थांबवून नेमक्या किती आंबेडकरी आणि नक्षली कार्यकर्त्यांना अटक केली हे सांगावे. कारण नसताना आंबेडकरी व नक्षल कार्यकर्त्यांकडून हिंसाचार घडविला जात असल्याचे चित्र उभे केले जात आहे. दहशतवादाच्या नावाखाली दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी आता भानामतीचा खेळ थांबवावा. कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराची पाळेमुळे ही गोळवलकरांच्या ‘‘बंच आॅफ थॉटस’’ मध्ये दिसून येतात. 
 पक्षाच्यावतीने संविधान सन्मान अभियान राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राबविण्यास सुरुवात झाली असून येत्या ६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळातील निवडणूकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी नागरिकांना जोरदार आवाहन करण्यात येणार आहे. यावेळी शैलेंद्र मोरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
* मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र त्यांना स्वतंत्र गटातून आरक्षण देण्यात यावे. ओबीसी किंवा आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे. सध्या काही धर्मांध शक्ती अ‍ॅट्रॉसिटीच्या नावाखाली समाजात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे सांगून गुजरात मधील सरदार सरोवर येथे उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळयाविषयी भाष्य करताना डांगळे म्हणाले, पटेलांच्या पुतळयाला विरोध नाही. त्यांनी सर्वात प्रथम संघावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. मात्र हे करत असताना पंडित नेहरुंचे अवमुल्यन करणे चुकीचे आहे. 

Web Title: 'Raj Dharma' is not followed by Chief Minister in Koregaon : Arjun Dangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.