अवकाळी, गारपिटीचा फटका..! सात हजार हेक्टरला, ११ जिल्ह्यांतील ३० तालुके बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:46 IST2026-03-20T09:45:50+5:302026-03-20T09:46:52+5:30
अवकाळी, गारपिटीचा फटका सात हजार हेक्टरला, ११ जिल्ह्यांतील ३० तालुके बाधित, रब्बीची पिके जमीनदोस्त

अवकाळी, गारपिटीचा फटका..! सात हजार हेक्टरला, ११ जिल्ह्यांतील ३० तालुके बाधित
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांना फटका बसला आहे. यामध्ये सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा, कांदा, आंबा, तसेच फळपिकांचा समावेश आहे. या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाचे संयुक्त पथक प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल करणार असल्याची माहिती विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर गारपीटही झाली आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाच्या गहू, हरभराच्या पिकांची काढणीची कामे सुरू असतानाच या अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांचा हाती आलेला घास हिसकावून नेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १४ ते १८ मार्च या कालावधीत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवकाळी पाऊस झाला असून, यातून ३० तालुक्यांमधील ६ हजार ९१३ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत.
त्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, मका, केळी, आंबा, ज्वारी, कलिंगड, खरबूज, ऊस, पपई, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, भाजीपाला, भुईमूग या पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड, धाराशिव, यवतमाळ, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर व संभाजीनगर यांचा समावेश आहे. सर्वाधिक ३ हजार ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात झाले आहे. तर संभाजीनगर जिल्ह्यात ९९१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
जिल्हा नुकसान (हेक्टरमध्ये)
कोल्हापूर ०.१०
नागपूर ४१.१७
चंद्रपूर १०.६०
लातूर ५२
नांदेड ८४.२५
धाराशिव १०१४
यवतमाळ १४०.९०
सोलापूर १७६.६०
पुणे ८४४.७०
अहिल्यानगर ३५५८.५०
संभाजीनगर ९९१
एकूण ६९१३.८२