जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’च्या कारखान्यावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 17:38 IST2022-11-06T17:38:36+5:302022-11-06T17:38:54+5:30
पाच जणांना अटक : ५२ लाखांचा माल जप्त

जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’च्या कारखान्यावर छापा
पुणे : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसीन औषधाचे बेकायदेशीरपणे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाचजणांना अटक करण्याबराेबरच कारखान्यातून तब्बल ५२ लाख रुपयांचा माल पाेलिसांनी जप्त केला आहे.
समीर कुरेशी (वय २९), विश्वजित जाना, मंगल गिरी (वय २७), सत्यजित मोन्डल, श्रीमंता हल्वर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाबूभाई ऊर्फ अल्लाउद्दीन याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, ऑक्सिटाेसिन हे एक हार्मोंन आहे. प्रसूती दरम्यान महिलांना हे इंजेक्शन दिले जाते. हे लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणून ओळखले जाते. त्याचा वापर केल्याने जनावरांकडून दूध जास्त मिळते, याचा प्रसार झाला. परंतु, अशा इंजेक्शन दिलेल्या जनावरांचे दूध पिल्याने अनेक राेगांना आमंत्रण मिळू शकते. शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. श्रवण कमजोरी, दृष्टीहीनता, पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. जनावरांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या इंजेक्शनवर निर्बध घालण्यात आले आहे.
कलवड वस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये या इंजेक्शने उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे हवालदार पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती देऊन या पत्र्याच्या शेडवर छापा घातला. तेव्हा तेथे या इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात असल्याचे दिसून आले.
आरोपींपैकी समीर कुरेशी हा मुख्य सूत्रधार असून, त्याने या पत्र्याच्या शेडमध्ये या इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले आहे. इतरांच्या मदतीने ते औषध विक्रेते असल्याचे भासवून शेतकऱ्यांना ऑक्सिटोसीन औषधाची विक्री करीत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंजेक्शनचा साठा, ते तयार करण्यासाठीचे साहित्य असा ५२ लाखांचा माल सापडला असून, पोलिसांनी ताे जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ढेंगळे अधिक तपास करीत आहेत.