संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रोटी घाटात रेसिंग बाइकचा अपघात, चालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:34 IST2025-02-08T12:33:51+5:302025-02-08T12:34:19+5:30
- परिवहन विभाग व महामार्ग पोलीसांच्या कारवाईची गरज

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रोटी घाटात रेसिंग बाइकचा अपघात, चालक जखमी
वासुंदे - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असलेल्या दौंड तालुक्यातील रोटी घाटात आज सकाळी १०.३० च्या सुमारास रेसिंग बाइकचा अपघात होऊन चालक जखमी झाला. यावेळी सुदैवाने वाहतूक कमी असल्याने विपरीत घटना घडली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नव्याने बांधण्यात आला असल्याने तो प्रशस्त व नयनरम्य दिसत आहे. त्यामुळे या मार्गावर बाजारात येणाऱ्या नवनविन चारचाकी गाड्यांचे चित्रीकरण करण्यासाठी तसेच बाइक रेसिंगसाठी शहरातून मोठ्या संख्येने तरुण येत असतात.
या चारचाकी गाड्यांचे चित्रीकरण सुरू असताना त्या बेफाम वेगात या मार्गावरून पळवल्या जातात. तसेच बाइक रेसिंग करणारे तरुणांकडून अति वेगात गाड्या चालवल्या जातात. त्यामुळे इतर वाहन चालक व दुचाकीस्वारांना असल्या कसरती धोकादायक ठरत आहेत. आजच्या घटनेत बाइक रेसिंग करणारा युवक रोटी घाटातील तीव्र उताराच्या वळणावरून थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये पडला. सुदैवाने या ठिकाणी विपरीत घटना घडली नाही. या मार्गावरून केल्या जाणाऱ्या बाइक रेसिंगवर व चारचाकी गाड्यांच्या धोकादायक चित्रीकरणावर परिवहन विभाग व महामार्ग पोलीसांनी वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.