Ajit Pawar: सकाळी ६ वाजता वाहनाच्या रांगा; पीक अवरला काय होत असेल? अजितदादा थेट चाकण एमआयडीसी भागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:53 IST2025-08-08T09:52:17+5:302025-08-08T09:53:56+5:30
सकाळी ६ वाजता मी या रत्स्यावरून आलो, वाहनांच्या रांगा एवढ्या सकाळी दिसून आल्या आहेत. म्हणजे पीक अवर किती ट्राफिक होत असेल, उपाययोजना करा

Ajit Pawar: सकाळी ६ वाजता वाहनाच्या रांगा; पीक अवरला काय होत असेल? अजितदादा थेट चाकण एमआयडीसी भागात
चाकण: चाकणवाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी (दि.८) ऑगस्टला भल्या पहाटे चाकणच्या परिसरातील वाहतूक कोंडीच्या चौकांची पाहणी केली.पुढील पंधरा दिवसांत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
पुणे - नाशिक आणि चाकण - तळेगाव - शिक्रापूर तसेच चाकण - आंबेठाण - वासुली फाटा या मार्गांवर वाहतूक कोंडी नित्याची असती. याच मार्गांवरून औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना येजा करावी लागते.तब्बल चार ते पाच हजार कंपन्या कार्यरत आहे. त्यात पाच लाख कर्मचारी काम करतात.त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे.
अजित पवार म्हणाले, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी पावणे सहा वाजता आलो.नॅशनल हायवे,पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे,त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय,तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
चाकणला स्वतंत्र महानगरपालिका करावी लागणार आहे.काहींना आवडेल न आवडेल,पण हे करावं लागेल.सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
पोलीस आयुक्तांना अजितदादांनी खडसावलं
एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी करत असताना चाकणच्या तळेगाव चौकात पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना खडसावले, हे बरोबर नाही.मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?,सगळी वाहतूक सुरु करा,असं पवार यांनी बजावल. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक कोंडीचा आढावा घेताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.