अपघातग्रस्त नवले ब्रीज जवळ मुंबई बेंगलोर महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 15:00 IST2021-03-09T15:00:03+5:302021-03-09T15:00:43+5:30
मुंबई- बंगलोर महामार्गावरच्या नवले ब्रीज ते कात्रज या परिसरात सातत्याने अपघात होत असतात..

अपघातग्रस्त नवले ब्रीज जवळ मुंबई बेंगलोर महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी
पुणे : अपघातग्रस्त नवले ब्रीज जवळच्या हायवेचे रुंदीकरण करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड करायला पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने अखेर मंजुरी दिली आहे.
मुंबई- बंगलोर महामार्गावरच्या नवले ब्रीज ते कात्रज या परिसरात सातत्याने अपघात होत होते. या परिसरात सर्व्हिस रोड नसणे हे या अपघात होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे समोर आले होते. या सर्व्हिस रोडचे काम देखील एनएचएआयच्या वतीने सुरु करण्यात आले होते. मात्र यासाठी जवळपास ५०० झाडे तोडणे आवश्यक होते. ही वृक्ष तोड करण्यासाठी एनएचएआयने पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. मात्र या ठिकाणी हरित पट्टा तयार करण्याची अट घालत प्राधिकरण सदस्यांनी परवानगी रोखली होती.
वृक्ष प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुन्हा चर्चेला आला. त्यावेळी अखेर ही परवानगी देण्यात आली.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य शिल्पा भोसले यांनी लोकमत शी बोलताना सांगितले “ या परिसरात रस्ता रुंदीकरण आवश्यक होते. मात्र वृक्ष तोड होत असताना इथला हरित पट्टा कायम रहावा अशी आमची भुमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करुन तीन झाडे लावल्यावर एक कापायची परवानगी दिली आहे.”
याबाबत एनएचएआयचे अधिकारी म्हणाले “ कोणतीही वृक्ष तोड न करता आम्ही काम सुरु ठेवले आहे. आता परवानगी मिळाली की उर्वरित काम सुरु केले जाईल”