संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, खर्च आम्ही करायला तयार आहोत - संभाजी ब्रिगेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:50 IST2025-05-23T16:49:14+5:302025-05-23T16:50:20+5:30
मराठा-बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून पोरांच्या डोक्यामध्ये जातीवादी विष पेरतो

संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, खर्च आम्ही करायला तयार आहोत - संभाजी ब्रिगेड
पुणे : दरवर्षी ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तसेच या सोहळ्याला हजारो शिवप्रेमी उपस्थित राहताता. मात्र रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यावरून पुण्यातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे यांनी भिडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मनोहर भिडेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका असं ते म्हणाले आहेत.
शिंदे म्हणाले, मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध आहे. 6 जून ही तारीख 'नामशेष' करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता. त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्रा चावल्यामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे. मराठा-बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो आणि पोरांच्या डोक्यामध्ये धर्मांध, विकृत आणि जातीवादी विष पेरतो. हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे.
खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार
6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या घटनेला 351 वर्ष पूर्ण झाली आणि त्या दिवसाला हा माणूस जर 'नामशेष' करून टाका म्हणत असेल. तर हा 100% शिवद्रोह आहे. मनोहर भिडे च्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की, वेळीच मनोहर पंत भिडे यांना आवरा आणि तात्काळ येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भिडे यांची रवानगी करा. त्याचा खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार आहे. ही असली विकृत माणसं महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं ही धोकादायक गोष्ट आहे. कुत्रा चावल्यामुळे मनोहर पंत भिडे हे पिसाळल्यासारखं बोलत आहेत.