Pune Winter News: पुणेकरांनो रेनकोट ठेवा अन् स्वेटर काढा; शहरातील थंडीचा कडाका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 14:40 IST2022-10-30T14:39:49+5:302022-10-30T14:40:15+5:30
राज्यातील सर्वच भागांतील किमान तापमानात घट होतीये

Pune Winter News: पुणेकरांनो रेनकोट ठेवा अन् स्वेटर काढा; शहरातील थंडीचा कडाका वाढला
पुणे : राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि उत्तर भारतात सुरू झालेली बर्फवृष्टी यामुळे राज्यातील किमान तापमानात वेगाने घसरण होऊ लागली आहे. शहरातील थंडीचा कडाका वाढत चालला आहे. पुणे शहरात शनिवारी सकाळी किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. शुक्रवारी १३.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान होते. राज्यात औरंगाबाद येथे सर्वात कमी १२.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वच भागांतील किमान तापमानात घट होत आहे.
पुणे शहरात दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. शनिवारी सायंकाळी कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ही सरासरीच्या तुलनेत एक अंशाने कमी आहे. दिवाळीनंतर थंडीचा कडाका वाढत जातो. त्याप्रमाणे, यंदाही थंडी वाढत जात आहे. गेल्या १० वर्षांचा आढावा घेतल्यास ३० ऑक्टोबर २०१६ रोजी शहरातील किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके कमी झाले होते. त्यानंतर, ३० ऑक्टोबर, २०१८ रोजी किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस होते. ऑक्टोबर महिन्यातील शहरातील सर्वात कमी किमान तापमान २९ ऑक्टोबर १९६८ रोजी ९.४ अंश सेल्सिअस इतकी निचांकी नोंद झाली होती.