पुरंदरचे नाझरे धरण 'ओव्हरफ्लो'; बळीराजा खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:08 IST2022-08-17T13:06:26+5:302022-08-17T13:08:06+5:30
७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठा क्षमतेचे जलाशय पुर्ण क्षमतेने भरले

पुरंदरचे नाझरे धरण 'ओव्हरफ्लो'; बळीराजा खुश
जेजुरी : जेजुरी नजीकचे नाझरे जलाशय रात्री ८ वाजता भरून वाहू लागले. जलाशय भरून वाहू लागल्याने धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठा क्षमतेचे जलाशय पुर्ण क्षमतेने भरले आहे.
राज्यभरातील सर्वच धरणे भरली जात असताना पुरंदर तालुक्यातील नाझरे जलाशय मात्र भरलेले नव्हते. पुरंदरला पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने कऱ्हा वाहत नव्हती. पर्यायाने जलाशयात पाणी येत नव्हते यामुळे परिसरातून चिंता व्यक्त होत होती. मात्र गेल्या १५ दिवसातील समाधानकारक पावसामुळे नदीला पाणी आले. जलाशयात हरे पाणी साठा वाढू लागला होता. धरण भरण्याची शक्यता ही निर्माण झाली होती. काल रात्री मात्र जलाशय भरून वाहू लागले. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतीसिंचन आणि ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. कऱ्हा नदीतून आज २०० क्यूसेक वेगाने जलाशयात पाणी येत आहे.तर कालव्यातून ५४ क्यूसेक वेगाने तर नदीपात्रात १५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.