Purandar Airport : पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा;दोन धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी २२०० एकर जमीन देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:10 IST2025-09-06T13:10:20+5:302025-09-06T13:10:51+5:30

- एकीकडे हे विमानतळ क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ, तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार

Purandar airport to be built as per plan 2200 acres of land will be provided for two runways and a terminal | Purandar Airport : पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा;दोन धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी २२०० एकर जमीन देणार

Purandar Airport : पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा;दोन धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी २२०० एकर जमीन देणार

पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या जमिनीत निम्म्याहून कपात केल्यानंतर प्रत्यक्ष टर्मिनल आणि धावपट्टीसाठी मात्र, पूर्वीच्या आराखड्यानुसारच अर्थात सुमारे २ हजार २०० एकर जमीन कायम ठेवण्यात आली आहे. यात दोन धावपट्ट्या असतील. एकीकडे हे विमानतळ क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ, तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे. दुसरीकडे मालाच्या साठवणुकीपासून वाहतुकीची सोय असलेल्या लॉजिस्टिक हबच्या जागेत मात्र, मोठी कपात करण्यात आली आहे.

पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे ७ हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते. त्याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलनही केले. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यानंतर भूसंपादन क्षेत्रात कपात करण्याचा निर्णय घेतला. सुमारे चार हजार एकर क्षेत्र कपात केल्यानंतर आता विमानतळासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात मूळ विमानतळासोबत लॉजिस्टिक हबचाही समावेश आहे. मात्र, संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीत सुमारे ६० टक्के कपात केल्यानंतर मूळ विमानतळासाठी किती जमीन देण्यात येईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता.

याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, पूर्वीच्या आराखड्यानुसार जमीन निम्म्याहून अधिक कमी करण्यात आली असली तरी विमानतळाच्या टर्मिनल धावपट्टीसाठीची जागा मात्र तीच कायम ठेवण्यात आली आहे. यासाठी सुमारे २ हजार २०० एकर जागा वापरण्यात आहे. तर लॉजिस्टिक हबच्या जागेत मात्र, मोठी कपात करण्यात आली आहे. लॉजिस्टक हबमध्ये उद्योगांच्या मालाची साठवणूक, दळणवळण निर्यात यासारखी कामे होतात. यात कंपन्यांना जागा दिली जाते. तसेच भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विकसित भूखंडांसाठी १० टक्के अर्थात सुमारे ३०० एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या विमानतळासाठी दोन धावपट्ट्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २२०० एकर जमीन देण्यात येणार असून, ही जागा राज्यातील सर्वात मोठी जागा ठरली आहे. नवी मुंबई येथील विमानतळासाठी १ हजार ३०० एकर जमीन वापरण्यात येत आहे. तर उत्तर प्रदेशातील एका विमानतळासाठी पुरंदरपेक्षा जास्त जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित पुरंदर विमानतळ देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Purandar airport to be built as per plan 2200 acres of land will be provided for two runways and a terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.