शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध; शरद पवार यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:39 IST2025-10-16T10:39:10+5:302025-10-16T10:39:31+5:30
शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही

शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध; शरद पवार यांचा सरकारला इशारा
सासवड : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा खणखणीत इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे, बबूसाहेब माहुरकर, दत्ता आबा चव्हाण, विमानतळ विरोधी कृती समितीचे दत्ता झुरंगे, संतोष हगवणे, जितेंद्र मेमाणे, सुनील धिवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या हातात आहे; पण शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य मोबदला आणि पॅकेज दिल्यास आमची हरकत नाही. मात्र, दांडगाईने मोजणी करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, तर सरकारला विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे.’ त्यांनी शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून विकास होत नसतो, असे सांगत सरकारने गावात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, दहाजणांची समिती नेमून सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी अंतिम तोडगा काढावा, असा सल्ला दिला. ‘कायदा हातात घेऊन दंडुके उगारून सक्तीने निर्णय लादू नका,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वपक्षीय समिती नेमण्याची मागणी
खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून निर्णय घ्यावा, असे सांगत सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. ‘तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आजी-माजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल याची खात्री करावी,’ असे त्या म्हणाल्या.
विमानतळ विरोधी समितीचा आक्षेप
विमानतळ विरोधी कृती समितीचे दत्ता झुरंगे, महादेव टिळेकर, संतोष हगवणे आणि जितेंद्र मेमाणे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय आणि विस्थापन होत असेल, तर प्रकल्प नको, अशी भूमिका मांडली. ‘रिंग रोड आणि इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जसा मोबदला मिळाला, तसाच मोबदला आम्हालाही मिळाला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांना विश्वासात घ्या
विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि सर्वपक्षीय समिती नेमून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
विमानतळ बाधित ग्रामस्थांची सभेकडे पाठ
सात गावातील विमानतळ बाधित ग्रामस्थांमध्ये दोन गट पडले असून, एक गट योग्य मोबदला दिल्यास जमिनी देण्यास तयार असून, त्यांनी बुधवारी खानवडी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी काही ग्रामस्थांनी मोबदला कशाप्रकारे मिळावा याचीदेखील मसुदा तयार करून शरद पवार यांना दिला, तर विमानतळ कोणत्याही परिस्थितीत नकोच या मागणीचा एक गट ठाम असून, त्यांनी पुण्यामध्ये ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद घेतली. यास बहुसंख्येने सात गावातील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.