Pune Metro: पुणेकरांची ‘आपली मेट्रो’; साडेतीन वर्षांत तब्बल १० कोटी नागरिकांचा प्रवास, दर महिन्याला ८० हजारांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:36 IST2025-10-07T12:34:41+5:302025-10-07T12:36:01+5:30
वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी मेट्रो प्रशासन कटिबद्ध

Pune Metro: पुणेकरांची ‘आपली मेट्रो’; साडेतीन वर्षांत तब्बल १० कोटी नागरिकांचा प्रवास, दर महिन्याला ८० हजारांनी वाढ
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मार्च २०२२ पासून टप्प्याटप्प्याने मेट्रोची सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाली. मागील साडेतीन वर्षांत दि. ६ मार्च, २०२२ ते ४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मेट्रोतून १० कोटींहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. तर महिन्यांच्या सरासरी प्रवासी संख्या पाहता, यंदा मागील वर्षापेक्षा मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दर महिन्याला ८० हजारांनी वाढली आहे.
पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्याने झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्याने मोठी वाढ झाली आहे. ६ मार्च, २०२२ रोजी पहिला टप्पा (पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय) हे मार्ग सुरू झाल्यावर अंदाजित २० ते ३० हजार दैनंदिन प्रवासी संख्या होती. त्यानंतर १ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण विस्तारामध्ये (फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक) दैनंदिन प्रवासी संख्या एक ते एक लाख १० हजारांपर्यंत पोहोचले. तर ६ मार्च २०२४ रोजी पूर्व-पश्चिम कॉरिडोरची पूर्णत: (रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी) मार्ग सुरू झाल्यावर ही संख्या एक लाख २० ते एक लाख ३० हजार इतकी झाली. तर २९ सप्टेंबर २०२४ रोजी भूमिगत मार्ग (जिल्हा न्यायालय ते स्वारगेट) सुरू झाल्यावर अंदाजित १ लाख ६० हजार ते दोन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करण्यास सुरुवात केली. या काळात पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडून केवळ एक आकडेवारी पूर्ण केलेली नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या भविष्यातील विकासाची पायाभरणी केली आहे. जलद वाहतुकीमुळे व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोपे होऊन आर्थिक चालना मिळत आहे. उर्वरित फेज-१ चे विस्तार आणि प्रस्तावित फेज-२ मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. यानंतर प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे.
यंदा प्रवासी संख्येत ८० हजारांनी वाढ
मागील वर्षी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्ग सुरू झाले. त्यामुळे प्रवाशांना स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करणे सोयीचे झाले; परंतु दर महिन्याची सरासरी पाहता यंदा मेट्रोचे प्रवासी वाढले आहेत. याला पीएमपीचे तिकीट दरवाढ देखील कारणीभूत आहे. मागील वर्षी दर महिन्याला सरासरी ३९ लाख १४ इतके प्रवासी होते. तर यंदा ३९ लाख ९४ हजार इतके नागरिक मेट्रोतून प्रवास करत आहेत.
पुणे मेट्रो ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर पुणेकरांची ‘आपली मेट्रो’ बनली आहे. १० कोटी प्रवाशांमध्ये प्रत्येक पुणेकरांचा विश्वास आणि सहभाग आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून, भविष्यात आम्ही उर्वरित टप्पे पूर्ण करून अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
अशी प्रवासी संख्येची आकडेवारी
वर्ष ---- प्रवासी संख्या
२०२१-२२-- ५,१४,२१८
२०२२-२३--१३,३७,५४८
२०२३-२४--१,४९,३५,३७९
२०२४-२५--४,६९,७९,९६५
२०२५-२६(४ ऑक्टोबर)--३,५९,५४,१५१