पुणेकरास 10 लाखांना लुटले, CM चे सचिव अन् उपमुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव घेऊन फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 22:35 IST2022-03-02T22:34:47+5:302022-03-02T22:35:52+5:30
प्रविण विठ्ठल जगताप (वय ४९, रा. वाई, सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे येथील एका ४२ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पुणेकरास 10 लाखांना लुटले, CM चे सचिव अन् उपमुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव घेऊन फसवणूक
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे स्वीय सहायक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी ए यांच्या नावाने तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने सातार्यातील एकाला अटक केली असून त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण विठ्ठल जगताप (वय ४९, रा. वाई, सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे येथील एका ४२ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण जगताप हा अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख असल्याच्या बढाया मारत असतो. मंत्रालयातील तसेच पुणे महापालिकेतील टेंडरची कामे करुन देतो, असे सांगून तो फसवणूक करीत होता. त्याने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पुणे महापालिकेतील ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकींग करुन देतो, सांगितले. त्याने आपली ओळख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे पी ए हेमंत केसळकर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक मुसळे यांच्याशी ओळख असल्याची बतावणी केली. तुमचे काम करून देतो असे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून पुणे रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये ५ लाख रुपये रोख स्वीकारले. तसेच मित्रांमार्फतीने फिर्यादीकडून आणखी ५ लाख रुपये असे १० लाख रुपये उकळले. हा प्रकार जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घडला आहे.
दरम्यान पैसे दिल्यानंतरही आपले काम होत नसल्याने तसेच आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांनी खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांना चौकशीचा आदेश दिला. प्रविण जगताप याचा शोध घेत असता तो पुणे स्टेशन येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संदीप बुवा, उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, हेमा ढेबे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमोल आवाड, विजय कांबळे, विवेक जाधव, नितीन रावळ, अमर पवार यांनी सापळा रचून त्याला अटक केली. न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.