Pune ZP : निवडणुकीमुळे खोळंबलेल्या ५११ कोटींच्या कामांना होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 08:52 IST2024-12-20T08:51:59+5:302024-12-20T08:52:26+5:30
जिल्हा परिषदेच्या चार हजार १७६ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune ZP : निवडणुकीमुळे खोळंबलेल्या ५११ कोटींच्या कामांना होणार सुरुवात
पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेची कामे खोळंबली होती. मात्र, आता या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात तब्बल ५११ कोटींची कामे होणार आहेत. सर्व कामांना जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
दरम्यान, यामुळे जिल्हा परिषदेच्या चार हजार १७६ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरी सुविधा, जनसुविधांच्या कामांसह अंगणवाडी, शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती त्याचबरोबर जिल्ह्यातील गावांमधील पायाभूत मूलभूत सुविधा, अशी अनेक कामे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खोळंबली होती. मात्र, आता निवडणूक संपून मंत्रिमंडळ स्थापनेमुळे या कामांनी आता वेळ घेतला आहे. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)ने मंजूर केलेल्या आराखड्यापैकी ५११ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेचा चार हजार १७६ कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यापैकी आतापर्यंत चार हजार १७२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, तर तीन हजार ७१९ कामांची तांत्रिक मान्यतांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १९८ कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, तीन कामांना सुरुवात करण्याचा आदेश दिला आहे. जन सुविधा आणि नागरी सुविधांच्या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, जन सुविधांच्या २९९ आणि नागरी सुविधांच्या २८ कामांच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या दोन प्रमुख कामांशिवाय ५३ अंगणवाडी बांधण्यासाठी पाच कोटी ९६ लाख रुपये, तर शाळांच्या दुरुस्तीसह इतर १२० कामांसाठी २८ कोटी ४३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अद्याप निश्चित झालेले नाहीत.
जिल्हा परिषदेची चार हजार १७२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. काही कामांची तांत्रिक मान्यता पूर्ण झाली असून, १९८ कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी तीन कामे सुरू झाली आहेत. -चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद