Nirmala Nawale: कारेगाव निवडणुकीत ड्रग्जचा वापर? तरुणांचे भविष्य धोक्यात? पराभवानंतर निर्मला नवलेंचा गंभीर आरोप
By किरण शिंदे | Updated: February 11, 2026 15:03 IST2026-02-11T15:01:20+5:302026-02-11T15:03:00+5:30
Pune ZP Election Result 2026 या निवडणुकीदरम्यान माझ्या गावातील सुमारे ३० ते ४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले असून, याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येतील,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली

Nirmala Nawale: कारेगाव निवडणुकीत ड्रग्जचा वापर? तरुणांचे भविष्य धोक्यात? पराभवानंतर निर्मला नवलेंचा गंभीर आरोप
पुणे: पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या पुन्हा एकदा सोशल मीडियावरील त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या नवले यांचा पराभव झाला. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कारेगाव पंचायत गटात झालेल्या या निवडणुकीत नवले यांचा ३२९ मतांनी पराभव झाला. पराभवानंतर निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आणि अमली पदार्थांचाही वापर झाल्याचा आरोप केला आहे.
व्हिडिओमध्ये बोलताना नवले म्हणाल्या की,“३२९ मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी अनपेक्षित होता. प्रचंड पैशाचा वापर होऊनही ६५७७ मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मात्र या निवडणुकीत पैसा आणि बोगस मतदान जिंकले, माणूस हरला हे कटू सत्य आहे. माझ्या गणातील काही मतदार काही पैशासाठी पुढील पाच वर्षांसाठी विकले गेले आहेत. ही भावना मला अस्वस्थ करते,” असे त्यांनी सांगितले.
नवले यांनी निवडणुकीदरम्यान दारूसोबत ड्रग्जचाही वापर झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुण कार्यकर्त्यांना रात्रभर जागे ठेवण्यासाठी अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला. या निवडणुकीदरम्यान माझ्या गावातील सुमारे ३० ते ४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले असून, याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येतील,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय सध्याच्या राजकारणावर बोलताना नवले म्हणाल्या की, आज लोकांची कामे, सुखदुःख आणि पक्षनिष्ठा यांना किंमत उरलेली नाही. जास्त पैसे वाटणारा उमेदवार निवडणुकीत पुढे जातो. त्यामुळे राजकारणात येणाऱ्यांनी पैसा कमवून निवडणुकीत वापरावा आणि जिंकल्यानंतर मतदारांकडे पाठ फिरवावी, अशी विकृत परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका त्यांनी केली.