पुणे : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७३ गटांपैकी ५१ गटांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप १०, तर शिंदेसेना, उद्धवसेनेला अनुक्रमे ५ आणि ६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार)ला एक जागा मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३ पैकी ८ पंचायत समितींवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. तीन पंचायत समितींचे चित्र संमिश्र असून, भाजप आणि उद्धवसेनेने प्रत्येकी एका पंचायत समितीची सत्ता मिळवली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बदललेली राजकीय समीकरणे, नाराज गट, अपक्षांचा प्रभाव आणि अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे तयार झालेली भावनिक पार्श्वभूमी या सर्वांचा निवडणूक निकालांवर ठळक परिणाम दिसून आला. मावळ, बारामती, इंदापूर आणि वेल्हे या तीन तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांचे नामोनिशाण पुसले. महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात भाजपचे आजी-माजी तीन आमदार, पदाधिकाऱ्यांची मोठी फौज असतानादेखील केवळ १० जागांवर भाजपला यश मिळवता आले. विशेष म्हणजे दौंडमध्ये पक्षाचा आमदार असतानाही तेथे सात पैकी एका गटावर विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्याकडून भाजपला मोठी आशा होती. पण, भोर-वेल्हा आणि मुळशी तसेच पुरंदरमध्ये भाजपला अपेक्षित असे स्थान मिळवता आले नाही. शिरूरमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. सात गटांपैकी तीन जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर हवेलीमध्येही भाजपला मोठा फटका बसला आहे. त्या ठिकाणी सहा पैकी एक जागा मिळाली आहे.
रिल स्टार निर्मला नवले यांना झटका
रिल स्टार व कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कारेगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे पाच लाख फॉलोअर्स असल्याचे बोलले जाते. याच्या जिवावर त्या पंचायत समिती निवडणुकीत नशीब आजमावत होत्या. परंतु, त्यांना मोठा झटका बसला असून, माजी पंचायत समिती सदस्या मनीषा पाचंगे यांनी त्यांचा ३३५ मताधिक्याने पराभव केला आहे. याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेचे पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी (अजित पवार) ५१
भाजप १०शिंदेसेना ५उद्धवसेना ६राष्ट्रवादी (शरद पवार) १
एकूण ७३
१३ पंचायत समिती स्थिती
राष्ट्रवादी (अजित पवार) ८भाजप १उद्धवसेना १संमिश्र स्थिती ३
गड आला, पण सिंह गेला
जिल्हा परिषदेवर भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी व्यूहरचना आखली होती. किमान २५ ते ३० जागा भाजपला मिळतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्यातच प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ घरोघरी जाऊन भेट देत पत्रके वाटली होती. दुसरीकडे भाजपच्या अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या. मात्र, तरीही नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप दिले. विशेष म्हणजे विजयी उमेदवारांनी अजित पवार यांना विजय समर्पित केल्याची भावनाही व्यक्त केल्या. काटी-लाखेवाडी गटातून विजय मिळवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत ढोले यांनी अजित पवार यांची प्रतिमा हातात घेऊन गड आला, पण सिंह गेला अशी भावना व्यक्त केली.
Web Summary : NCP secured a clear majority in Pune ZP elections, winning 51 of 73 seats. They also dominate 8 of 13 Panchayat Samitis, fueled by sympathy after Ajit Pawar's death. BJP secured 10 ZP seats.
Web Summary : पुणे जिला परिषद चुनावों में राकांपा ने 73 में से 51 सीटें जीतकर स्पष्ट बहुमत हासिल किया। अजित पवार के निधन के बाद सहानुभूति की लहर में राकांपा ने 13 में से 8 पंचायत समितियों पर भी दबदबा बनाया। भाजपा को 10 सीटें मिलीं।