जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी 'साहेब' आणि 'दादा’ एकत्र येणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 20:25 IST2026-01-13T20:23:46+5:302026-01-13T20:25:26+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोणती आघाडी, कोणता पॅटर्न राहणार, यावरच संपूर्ण राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.

जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी 'साहेब' आणि 'दादा’ एकत्र येणार ?
बारामती : तब्बल आठ वर्षांनंतर बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकांत उदयास आलेल्या वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोणती आघाडी, कोणता पॅटर्न राहणार, यावरच संपूर्ण राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.
बारामती नगरपरिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, भाजप व शिंदे गटाची शिवसेना यांनी एकमेकांविरोधात स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र माळेगावमध्ये राष्ट्रवादी–भाजप युती झाली. त्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बारामतीत होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महानगरपालिका पॅटर्न कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत सुपे–मेडद, शिर्सुफळ–गुणवडी, माळेगाव बु.–पणदरे, करंजेपूल–निंबूत, वडगाव निंबाळकर–मोरगाव, सांगवी–डोर्लेवाडी असे जिल्हा परिषद गट होते. सुपे, मेडद, शिर्सुफळ, गुणवडी, माळेगाव बु., पणदरे, वडगाव निंबाळकर, मोरगाव, करंजेपूल, निंबूत, सांगवी व डोर्लेवाडी असे पंचायत समितीचे गण होते. त्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे १२ही गण राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकत ‘क्लीन स्विप’ केला होता. सुपे–मेडद गटात भाजपने मोठी ताकद लावूनही अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीने व्यूहरचना करत बाजी मारली होती. सांगवी–डोर्लेवाडी व माळेगाव–पणदरे गटातही भाजपने राष्ट्रवादीला कडवी झुंज दिली होती.
मात्र यंदा लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर बारामती शहर व तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. २०१७ मध्ये शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते आणि भाजप–शिवसेना हे प्रमुख विरोधक होते. २०२५ मध्ये मात्र परिस्थिती पूर्णतः बदलली असून, पूर्वी विरोधक असलेला भाजप आज राष्ट्रवादी (अजित पवार गट)सोबत महायुतीचा प्रमुख घटक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट तालुक्यात सक्रिय झाले आहेत.
शरद पवार गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. लोकसभेत या गटाला यश मिळाले असले, तरी विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला. सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य अजित पवार गटात असून, तालुका व शहरातील अर्थकारणाशी निगडित बहुतांश महत्त्वाच्या संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे पुणे व महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच येथेही तीच राजकीय समीकरणे कायम राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. भाजप स्वतंत्र लढणार की युतीत, यावरही संभ्रम असून वरिष्ठ पातळीवरील बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
यंदा पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.
त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार
दरम्यान, माळेगावचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने पणदरे हा नवा गट तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधक चंद्रराव तावरे यांची भूमिका या निवडणुकीवर परिणाम करणारी ठरणार आहे. भाजप नेत्यांचा शिर्सुफळ गणात प्रभाव असून, याच गणात राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे सभापतिपद दिल्याने ही लढतही लक्षवेधी ठरणार आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या निर्णयांवर दुरंगी की तिरंगी लढत होणार, हे अवलंबून राहणार आहे.