तीन पंचायत समितींच्या ३ गणांमध्ये दोन ईव्हीएमचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 22:25 IST2026-01-30T22:23:58+5:302026-01-30T22:25:01+5:30

उमेदवारांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय, एकूण ३६९३ ईव्हीएम आणि ३६०५ कंट्रोल युनिटची गरज

Pune Zilla Parishad Election Two EVMs used in 3 constituencies of three Panchayat Samiti | तीन पंचायत समितींच्या ३ गणांमध्ये दोन ईव्हीएमचा वापर

तीन पंचायत समितींच्या ३ गणांमध्ये दोन ईव्हीएमचा वापर

पुणे : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांसाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्या अंतिम केली आहे. त्यानुसार आता ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४३ पैकी केवळ तीन गणांमध्ये दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीत मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या हजारांहून अधिक तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १४ हजार ३३८ मतदान यंत्रांची उपलब्धता करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही उपलब्धता आता दुपटीऐवजी चारपट केली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७३ गटांमध्ये २९९ उमेदवार आता रिंगणात उरले असून पंचायत समितीच्या १४३ गणांसाठी ५२८ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत पंचायत समितीसाठी ७२९ तर जिल्हा परिषदेसाठी ४२८ जणांनी माघार घेतल्याने आता मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्याही अंतिम करण्यात आली आहे. त्यानुसार आता ३६०५ मतदान केंद्रांसाठी ३ हजार ६९३ मतदान यंत्रे लागणार आहेत. तर ३ हजार ६०५ कंट्रोल युनिट लागणार आहेत.

------------

तर उमेदवारांची संख्या वाढल्याने बारामती, मुळशी आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गणात दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. त्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी गटातील माण गण, बारामती तालुक्यातील पणदरे गटातील पणदरे गण इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गटातील सणसर गणाचा समावेश आहे. त्यानुसार मुळशी तालुक्यात २२७ मतदान केंद्रांवर २६२ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. बारामती तालुक्यातील २९९ मतदान केंद्रांवर ३२४ मतदान यंत्रे तर इंदापूर तालुक्यातील ४०० मतदान केंद्रांवर ४२८ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. अन्य तालुक्यांत मतदान केंद्रांच्या संख्येइतकीच मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.

--------------

नगरपरिषदा व महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम व कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते एक तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती. यंत्रांची उपलब्धता कमी असल्याने मतदान यंत्रे बदलविण्यासाठी मोठा काळ गेला. त्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता चारपटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ३ हजार ६०५ मतदान केंद्रांवर १४ हजार ३३८ मतदान यंत्र व ५ हजार ८३३ कंट्रोल युनिट उपलब्ध असतील. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक ४०० मतदान केंद्र इंदापूर तालुक्यात असून यासाठी ४२८ मतदान यंत्र व ४०० कंट्रोल युनिट वापरण्यात येतील तर सर्वांत कमी १०५ मतदान केंद्र वेल्हा तालुक्यात असून तेथे प्रत्येकी १०५ मतदान यंत्र व कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उमेदवारांची संख्या निश्चित झाली असून त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे मतदान यंत्रे व कंट्रोल युनिटची संख्या अंतिम झाली आहे तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदान केंद्रांच्या व उमेदवारांच्या संख्येनुसार चार पट उपलब्धता ठेवण्यात आली आहे.  - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक यंत्रे व्यवस्थापन कक्ष

Web Title : पुणे जिला परिषद: तीन पंचायत समिति क्षेत्रों में दो ईवीएम का उपयोग

Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव के लिए ईवीएम की संख्या तय। अधिक उम्मीदवारों के कारण तीन क्षेत्रों में दो मशीनों की आवश्यकता। पिछली बाधाओं से बचने के लिए अतिरिक्त मशीनें उपलब्ध कराई गईं।

Web Title : Pune Zilla Parishad: Two EVMs in three Panchayat Samiti constituencies

Web Summary : Pune finalizes EVM count for Zilla Parishad elections. Three constituencies need two machines due to increased candidates. Extra machines provided to avoid past disruptions.