Zilla Parishad Election: कमळ फुलणार शिरूरमध्ये? अजित पवारांचे विश्वासू माजी आमदार भाजपमध्ये जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:49 IST2026-01-20T09:41:08+5:302026-01-20T09:49:58+5:30

कवठे येमाई–टाकळी हाजी गटात भूकंप; गावडे कुटुंबीय धरणार हातात कमळ

Pune Zilla Parishad Election Earthquake in Kavathe Yemai-Takali Haji group; Gawade family will hold lotus in their hands | Zilla Parishad Election: कमळ फुलणार शिरूरमध्ये? अजित पवारांचे विश्वासू माजी आमदार भाजपमध्ये जाणार

Zilla Parishad Election: कमळ फुलणार शिरूरमध्ये? अजित पवारांचे विश्वासू माजी आमदार भाजपमध्ये जाणार

मलठण : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी (अजित पवार)चे अत्यंत जवळचे विश्वासू माजी आमदार पोपटराव गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. गटामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असून, गावडे कुटुंबीय आता कमळ हातात धरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी अजित पवार गटाची साथ देत दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राजेंद्र पोपटराव गावडे यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र लढण्याचा अचानक निर्णय घेतल्याने संपूर्ण राजकीय गणित बदलले. त्याचा फटका राजेंद्र गावडे यांना बसला. त्यामुळे गावडे कुटुंब व त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

या अनपेक्षित घडामोडीनंतर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. कार्यकर्त्यांचा सन्मान आणि मतदारसंघाचा स्वाभिमान सर्वोच्च असून, पुढील निर्णय सर्वांच्या सल्ल्यानेच घेतला जाईल, असे सूचक विधान करीत त्यांनी लवकरच आपली भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावडे यांची उमेदवारी डावलल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखालीच तालुक्याचा विकास झाला. पक्षापेक्षा नेतृत्व महत्त्वाचे असून, ही निवडणूक त्याच आधारावर लढली पाहिजे,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यातच गावडे यांचे विश्वासू सहकारी आर. बी. गावडे यांनी बुधवारी भाजपचा झेंडा हातात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शविल्याने गावडे गट भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. स्वतः पोपटराव गावडे यांनीही, “जनतेने नेहमीच मला न्याय दिला आहे. आतापर्यंत १२ निवडणुका लढविल्या असून, एक वगळता सर्व जिंकल्या आहेत. पक्षांतराचा निर्णय सर्वांच्या मतानेच घेतला जाईल,” असे सांगितले. भाजप सत्तेत असून, मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिकच बळावली आहे.

Web Title : शिरूर में खिलेगा कमल? अजित पवार के वफादार पूर्व विधायक भाजपा में!

Web Summary : अजित पवार के करीबी पूर्व विधायक पोपटराव गावडे ने राकांपा छोड़ी, जिला परिषद चुनाव से पहले भाजपा में शामिल होने की अटकलें तेज; उम्मीदवार चयन पर असंतोष के बाद बदलाव।

Web Title : Will Lotus bloom in Shirur? Ajit Pawar's loyalist joins BJP.

Web Summary : Ex-MLA Popatrao Gawde, a close aide of Ajit Pawar, exits NCP, fueling speculation of joining BJP before the Zilla Parishad election. This shift follows discontent over candidate selection.