आधी रस्त्यावर लघुशंका, आता मस्ती उतरली..! गौरव आहुजा हात जोडून माफी मागत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 21:16 IST2025-03-08T21:10:50+5:302025-03-08T21:16:02+5:30
'कळत नकळत मोठी चूक झाली. मी संपूर्ण पुणेकरांची आणि पोलिसांची माफी मागतो

आधी रस्त्यावर लघुशंका, आता मस्ती उतरली..! गौरव आहुजा हात जोडून माफी मागत म्हणाला...
- किरण शिंदे
पुणे - येरवडा चौकात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा अखेर समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फरार असलेल्या गौरवने एक व्हिडिओ रिलीज करून हात जोडत आपल्या कृत्याची माफी मागितली असून, 8 तासांत स्वतःला पुणेपोलिसांसमोर हजर करणार असल्याचे जाहीर केले आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर गौरव आहुजा फरार ,आता स्वतःहून हजर होण्याची तयारी
गौरव आहुजा याचा सिग्नलवर लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली होती, मात्र तो कुठे लपून बसला होता याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर त्याने स्वतःच एक व्हिडिओ प्रसिद्ध करत माफी मागितली.
गौरव आहुजाची माफी,माझी मोठी चूक झाली, लवकरच पोलिसांसमोर हजर होईल
गौरवने या व्हिडिओत हात जोडून आपली बाजू मांडली आहे. या व्हिडिओत गौरव आहुजा माफी मागतांना दिसत आहे. व्हिडिओत तो म्हणाला, मी गौरव आहुजा...माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो. मला एक चान्स द्या, सॉरी. माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. पुढच्या आठ तासात मी येरवडा पोलीस ठाण्यात सरेंडर होईल.
पोलिसांची भूमिका,'माफ करणे हा पर्याय नाही, कायदेशीर कारवाई होईल'
गौरव आहुजा फरार असताना त्याचा मित्र भाग्यश ओसवाल याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. तसेच येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव आहुजाची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
गौरव आहुजा हा फेब्रुवारी 2021 मध्ये क्रिकेट बेटिंगप्रकरणी अटक झालेला आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने गँगस्टर सचिन पोटेला याच्या टोळीवर कारवाई करत क्रिकेट बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बेटिंगच्या विळख्यात ओढण्यात आले होते. याच प्रकरणात गौरव आहुजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गौरव आहुजा खरोखर पोलिसांसमोर हजर होणार का?
आता सर्वांचेच लक्ष पुढील 8 तासांवर आहे. गौरव आहुजा खरोखरच पोलिसांसमोर हजर होणार की पुन्हा पलायन करणार की पोलीस त्या पूर्वीच त्याला बेड्या ठोकणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.