ऋतू बदलामुळे पुणेकरांचे आरोग्य बिघडले; उष्णतेचा चढतोय पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:53 IST2026-02-07T15:52:33+5:302026-02-07T15:53:04+5:30

- परीक्षणाच्या तोंडावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी काळजी

pune weather news students, be careful Health has deteriorated due to seasonal change; Temperatures are rising | ऋतू बदलामुळे पुणेकरांचे आरोग्य बिघडले; उष्णतेचा चढतोय पारा

ऋतू बदलामुळे पुणेकरांचे आरोग्य बिघडले; उष्णतेचा चढतोय पारा

पुणे : हिवाळ्याची चाहूल संपताच शहरात उष्णतेचा पारा चढू लागला असून, ऋतू बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. मागील काही दिवसांत कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. त्याचबरोबर सकाळी व रात्री तापमानात तुलनेने गारवा राहिल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील फरक वाढला आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा तसेच त्वचेच्या व पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वाढत आहेत.

दहावी व बारावीच्या महत्त्वाच्या परीक्षा तोंडावर आल्या असून, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा ताण, मानसिक दडपण आणि बदलते हवामान याचा परिणाम दिसून येत आहे. परीक्षेच्या काळात योग्य नियोजन, आरोग्याची काळजी आणि सकारात्मक मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चुकीच्या सवयी, अपुरी झोप आणि अनियमित आहारामुळे अभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

वाढती उष्णता आणि काेरड्या हवामानाचा दुष्परिणाम :

अचानक वाढलेली उष्णता आणि कोरडे हवामान याचा विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींवर अधिक परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. शहरातील विविध रुग्णालये व दवाखान्यांमध्ये ताप, घशाचे विकार, पाणी कमी होणे (डिहायड्रेशन), उष्णतेमुळे होणारा थकवा अशा तक्रारींसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, पुरेसे पाणी न पिणे, उन्हात अधिक वेळ राहणे आणि ऋतू बदलानुसार आहार व दिनचर्या न बदलणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत. 

काळजी घ्या :

गेल्या सात दिवसात शहरात कमाल २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान १५ ते १७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानही हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला असून, हलका, पचायला सोपा आहार घ्यावा, भरपूर पाणी व द्रवपदार्थ सेवन करावेत तसेच आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांनी घ्यावी विशेष काळजी :

या काळात विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रकाद्वारे अभ्यास करावा. उरलेल्या अभ्यासाचा ताण न घेता पुनरावृत्तीवर भर द्यावा. सतत रात्री उशिरापर्यंत जागरण टाळून किमान सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी, जेणेकरून एकाग्रता टिकून राहील. मोबाइल, सोशल मीडियाचा अतिवापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

मानसिक तणाव कमी करण्यासाठी दररोज थोडा वेळ योग, ध्यान, प्राणायाम किंवा हलका व्यायाम करावा. परीक्षेची भीती मनात न ठेवता आत्मविश्वासाने तयारी करावी. पालकांनीही विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न आणता त्यांना मानसिक आधार द्यावा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, थकवा यांसारख्या तक्रारी वाढत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा. भरपूर पाणी पिणे, फळे, हिरव्या भाज्या, घरगुती व हलका आहार यांचा समावेश करावा. जंक फूड, बाहेरील तेलकट पदार्थ टाळावेत.  - डॉ. हरिदास प्रसाद, विभाग प्रमुख, औषध वैद्यकीशास्त्र विभाग, ससून 

Web Title : मौसम बदलने से पुणे का स्वास्थ्य बिगड़ा; छात्रों को ध्यान रखना चाहिए।

Web Summary : पुणे में तापमान बदलने से स्वास्थ्य प्रभावित, बुखार और थकान। डॉक्टर जलयोजन और दोपहर की धूप से बचने की सलाह देते हैं। परीक्षा की तैयारी करने वाले छात्रों को बेहतर प्रदर्शन के लिए नींद, स्वस्थ आहार और तनाव प्रबंधन को प्राथमिकता देनी चाहिए।

Web Title : Pune Health Worsens with Weather Change; Students Must Take Care.

Web Summary : Pune's fluctuating temperatures are impacting health, causing fever and fatigue. Doctors advise hydration and avoiding midday sun. Students preparing for exams should prioritize sleep, healthy diets, and stress management for optimal performance.