...तर त्याचा जीव वाचला असता :पुण्यात भिंत कोसळून सहा ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 17:06 IST2019-07-02T16:48:31+5:302019-07-02T17:06:14+5:30
अपघात कोणाच्याही हातात नसतो. पण मानवाच्या हलगर्जीपणाला निसर्गाचे नाव देणे मात्र चुकीचे आहे. चार दिवसांपूर्वी भिंत कोसळून १५ मजूर जीवाला मुकले असताना त्याच घटनेची पुनरावृत्ती आज पुण्यात घडली.

...तर त्याचा जीव वाचला असता :पुण्यात भिंत कोसळून सहा ठार
पुणे : अपघात कोणाच्याही हातात नसतो. पण मानवाच्या हलगर्जीपणाला निसर्गाचे नाव देणे मात्र चुकीचे आहे. चार दिवसांपूर्वी भिंत कोसळून १५ मजूर जीवाला मुकले असताना त्याच घटनेची पुनरावृत्ती आज पुण्यात घडली. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील भिंत कोसळून सहा बांधकाम मजूर जण ठार झाले. त्यांचे मृतदेह ससून रुग्नालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश ससूनला सुन्न करत होता.
सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत सहा व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले असून त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. यात राधेलाल पटेल(वय 25), त्यांच्या पत्नी ममता राधेलाल पटेल (वय २२ दोघे रा़ हातादाडु, नवागड, जि़ बेमेतरा, छत्तीसगड)), ममता यांचे वडील जेटू लाल पटेल (वय 50) आणि आई प्रदेशनिन जेतूलाल पटेल (वय ४५,दोघे रा़ रायपूर), अशा चौघांचा समावेश आहे. हे कुटुंब छत्तीसगड राज्यातील बेमेतारा जिल्ह्यातील आहे. यातल्या ममता आणि राधेलाल यांचे फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्न झाले होते. राधेलाल दुसऱ्या साईटवर मजूर म्हणून काम करत होते. ममता काही दिवसांकरिता माहेरी गेल्या होत्या. राधेलाल त्यांना घेण्यासाठी सासुरवाडीला गेले होते. नेमक्या रात्री अपघात घडल्याने सासू, सासरे आणि पत्नीसह राधेलाल यांचाही या अपघातात बळी गेला आहे. जर ते सोमवारी रात्रीच पत्नीसह परतले असते तर त्या दोघांचाही जीव वाचला असता हे सांगताना त्यांचे वडील रामनरेश पटेल यांना अश्रू अनावर झाले होते.