Video : क्षणात जीव वाचला..! पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 12:46 IST2025-07-13T12:45:24+5:302025-07-13T12:46:43+5:30
पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला.

Video : क्षणात जीव वाचला..! पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका
ओतूर (जुन्नर) - माळशेज परिसरातील सागनोरे येथे काळू धबधब्याजवळ एक गंभीर घटना घडली. पुण्याहून चार पर्यटकांना घेऊन आलेला ड्रायव्हर काळू नदीत पडून वाहू लागला होता. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला. नदीचा प्रवाह जोरदार असल्यामुळे तो वाहू लागला. मात्र, प्रसंगावधान राखून त्याने नदीतील दगडाचा आधार घेत थांबण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका#Pune#rescueoperation#KaluRiverpic.twitter.com/PDpFLSzU7k
— Lokmat (@lokmat) July 13, 2025
हा प्रकार पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून जवळच १०० ते १५० फूट अंतरावर असलेले स्थानिक व्यावसायिक तुषार मेमाणे, संदीप साबळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी स्कार्फ आणि शाली एकत्र करून दोरीसारख्या बांधल्या आणि त्या ड्रायव्हरकडे फेकून त्याला बाहेर ओढले. त्यांच्या या धाडसामुळे ड्रायव्हरचा जीव वाचला.
दरम्यान, निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात पावसाळी पर्यटनाला सुुरुवात झाली असून, धबधबे, रानवाटा, हिरवीगार डोंगरदऱ्या आणि ऐतिहासिक स्थळांकडे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, अनिल तांबे, विनायक तांबे, संभाजी तांबे, तुषार थोरात, धनंजय डुंबरे, रंगनाथ पा. घोलप, तानाजी तांबे, विशाल तांबे, भगवान घोलप, सुदाम घोलप, अनिल डुंबरे आदींनी सांगितले आहे.