खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला

By नितीश गोवंडे | Updated: March 16, 2025 18:21 IST2025-03-16T18:20:04+5:302025-03-16T18:21:04+5:30

मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहिला व होणारी वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले आहे

pune traffic speed increased by 16 to 19 percent between Kharadi and Wagholi | खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला

खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला

पुणे : सोलापूर रोडवरील अडथळे दूर केल्याने तेथील वाहतुकीचा वेग वाढला. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढाकार घेत अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतुक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी खराडी ते वाघोली दरम्यानच्या मार्गावर काही बदल केले.

यावेळी काही राईट टर्न बंद करणे, चौक सुधारणा, काही सिग्नल बंद करणे अशा छोट्या छोट्या बदलातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रोडवरील वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहतुकीचा वेग हा १६ ते १९ टक्क्यांनी वाढला आहे. पोलिस आयुक्तांनी अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रोडवरील येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोक प्रतिनिधींसह समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती, त्यानंतर योग्य त्या उपाय योजना वाहतूक शाखेकडून करण्याबाबत सूचना केल्या होत्या.

वाहतूक शाखेने नगर रस्त्यावरील वाहतूक समस्यांचा अभ्यास करुन वाहतूक कोंडी कमी करुन वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, काही राईट टर्न व यु टर्नमध्ये बदल करण्यात आले आहेत. येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगर कडे जाणार्या राईट टर्नमुळे मुख्य पुणे -नगर रोडवर वाहतूक कोंडी होत होती. हा राईट टर्न बंद करुन पुढे यु टर्न दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहिला व होणारी वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले आहे.

वडगाव शेरी चौकात पुण्याकडून नगर कडे जाताना राईट टर्न मारून वडगाव शेरी कडे जाणार्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्या वाहनधारकांना अग्निबाज गेट समोरून यू टर्न दिला. तसेच नगर रोडकडून पुण्याच्या दिशेने येणार्या वाहनांना मेट्रो पिलर क्रमांक ४२२/४२३ येथून यू टर्न दिला. हा बदल वाहनांची मोजणी व चौकातील सिग्नल मुळे मुख्य रस्त्याला होणाऱ्या कोंडीचा अभ्यास करुन करण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.

विमाननगर चौक (फिनिक्स मॉल) येथे राईट टर्न मुळे मुख्य रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. हा राईट टर्न बंद करुन चौक सिग्नल विरहित करण्यात आला. सोमनाथनगर चौक येथे यु टर्न करण्यात आला. तसेच नगरकडून पुण्याच्या दिशेने येणार्या वाहनांना विमाननगरकडे अग्निबाज गेट येथून यु टर्न दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले आहे.

खराडी दर्गा चौक राईट टर्न बंद केला असून आपले घर बस स्टॉप पासून यु टर्न केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सिग्नल विरहीत झाली आहे. एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीद्वारे वाहतूकीचा फ्लो पाहून करण्यात आलेल्या विश्लेषणाद्वारे नगर रोडवरील वाहतुकीचा वेग गेल्या वर्षीच्या जानेवारी व फेब्रुवारीच्या तुलनेत या वर्षी हा १६ ते १९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

एअरपार्ट रोड वरील ५०९ चौक ते गुंजन चौक या दरम्यान फेब्रुवारी २०२४ मध्ये सरासरी २८.७ किमी प्रति तास होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये तो सरासरी ३९.६ किमी प्रति तास झाला आहे.

नगर रोडवरील केसनंद फाटा ते शास्त्रीनगर चौक दरम्यान फेब्रुवारी २०२४ मध्ये सरासरी २४.९ किमी प्रति तास वेग होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये हा सरासरी वेग २६.४ किमी प्रति तास झाला आहे. तसेच शास्त्रीनगर चौक ते केसनंद फाटा या दरम्यान फेब्रुवारी २०२४ मध्ये सरासरी वेग २३.८ किमी प्रति तास होता. तो फेब्रुवारी २०२५ मध्ये सरासरी वेग २८.५ किमी प्रति तास झाला आहे. दरम्यान या रस्त्यावर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३४ हजार ३११ वाहनधारकांवर केसेस करून २ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: pune traffic speed increased by 16 to 19 percent between Kharadi and Wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.