Pune Traffic News : पुणे शहरातील उड्डाणपुलांसह रस्त्यांना अवैध पार्किंगचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:38 IST2025-09-11T12:38:28+5:302025-09-11T12:38:47+5:30

- रस्त्यावर पार्किंग, तर पदपथांवर अतिक्रमण; व्यावसायिकांच्या बेकायदा पार्किंगकडे वाहतूक पोलिसांची डोळेझाक

pune traffic news Illegal parking on city roads, including flyovers | Pune Traffic News : पुणे शहरातील उड्डाणपुलांसह रस्त्यांना अवैध पार्किंगचा विळखा

Pune Traffic News : पुणे शहरातील उड्डाणपुलांसह रस्त्यांना अवैध पार्किंगचा विळखा

- हिरा सरवदे

पुणे :
शहरातील विविध रस्त्यांवर, पदपथालगत, उड्डाणपुलाच्या खाली, ग्रेड सेपरेटर आदींना अवैध पार्किंगचा विळखा निर्माण झाला असून, पदपथांवर अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. ‘रस्त्यावर पार्किंग आणि पदपथावर अतिक्रमण’ असे चित्र ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.

शहरात प्रवेश करणाऱ्या विविध लहान-मोठ्या रस्त्यांसह पेठांमधील रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, रस्त्यांची रुंदी वाढवणे अशी कामे केली जातात. मात्र, वाहनचालक व पुणेकरांचीवाहतूक कोंडीतून सुटका होताना दिसत नाही. शहरातील सर्वच रस्त्यांवर दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होते.

या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील विविध रस्त्यांची पाहणी केली. यामध्ये रस्त्याच्या कडेला व पदपथांलगत बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात. उड्डाणपुलांखाली वाहने पार्किंग केली जातात. इतकेच नव्हे, तर शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या परिसरात ग्रेड सेपरेटरमध्येही बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात. शिवाय पदपथांवर व्यावसाय थाटण्यात आल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो. या सर्व गोष्टींचा रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे समोर आले.

महापालिका व वाहतूक पोलिस जबाबदार

रस्त्यावरील व पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाची आहे. तर रस्त्यावरील बेकादेशीरपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. मात्र, या दोन्ही प्रशासनाच्या विभागांकडून कामांत हलगर्जीपणा केला जातो. दोन्ही विभागाच्या अधिकांऱ्यात हप्तेखोरी बोकाळलेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्मण झाल्याचे वास्तव आहे.

व्यावसायिकांच्या वाहनांना पोलिसांचे अभय का?

सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग केली तर वाहतूक पोलिस त्याच्यावर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. गाडीमध्ये कुटुंबासह जाणाऱ्यांना अडवून विविध कारणांनी दंड वसूल करतात. मात्र, व्यावसायिक आपली चारचाकी व दुचाकी वाहने दिवस दिवस रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग करतात. मात्र, वाहतूक पोलिस व्यावसायिकांच्या वाहनांना मात्र अभय देत त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. 

Web Title: pune traffic news Illegal parking on city roads, including flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.