अंतर ५.४ कि.मी. अन् सिग्नल्स ११; सातारा रस्त्यावर होते आहे कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 14:52 IST2025-12-07T14:52:15+5:302025-12-07T14:52:35+5:30
- बीआरटी मार्गावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सिग्नल सिंक्रोनाइजेशन करण्याची नितांत आवश्यकता आहे

अंतर ५.४ कि.मी. अन् सिग्नल्स ११; सातारा रस्त्यावर होते आहे कोंडी
-पांडुरंग मरगजे
धनकवडी : सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रज दरम्यान सकाळ आणि संध्याकाळची वेळ म्हणजे ‘पिक अवर आणि वाहतूक कोंडी’ हे जणू समीकरणच बनले आहे. कात्रजपासून स्वारगेटपर्यंत केवळ ५.४ कि.मी. अंतरामध्ये तब्बल अकरा सिग्नल्स असून या सिग्नल्समध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दक्षिण पुणेकरांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. बीआरटी मार्गावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सिग्नल सिंक्रोनाइजेशन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
कात्रजपासून स्वारगेटपर्यंत ५.४ किमीच्या अंतरात दर ४९० मीटरवर एक याप्रमाणे ११ सिग्नल आहेत. प्रत्येक सिग्नलला सरासरी दोन-तीन मिनिटे जरी थांबायला लागले तरी जवळपास अर्धा तास या सिग्नलमध्येच जातो. त्यामुळे सकाळी स्वारगेटच्या दिशेला जाताना आणि संध्याकाळी स्वारगेटकडून येताना सिग्नलवर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि त्यामुळे वेळ, पेट्रोल तर वाया जातोच, त्याचबरोबर प्रचंड मानसिक त्रासासह ध्वनी व वायू प्रदूषण सुद्धा वाढत चालले आहे.
मग प्रश्न असा निर्माण होतो की, करोडो रुपये बीआरटी मार्गाची निर्मिती, सुशोभीकरण व बस थांब्यावर खर्च केले जात असताना त्यातील काहीशी रक्कम वाहतूक सुरळीत होण्यासाठी वापरली असती, तर या त्रासातून दक्षिण पुणेकरांना दिलासा मिळाला असता आणि त्यांचा प्रवासही सुखकारक झाला असता, असे मत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत टेंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ढिसाळ नियोजन, दूरदृष्टीचा अभाव, भ्रष्टाचाराचा अंतर्भाव या सगळ्या कारणांमुळे आज सुद्धा सातारा रस्त्यावर ‘पिक अवर’ला नागरिकांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते बालाजी पवार यांनी व्यक्त केली.
कात्रजपासून सुरू होणारे सिग्नल
(१) राजीव गांधी प्राणी संग्रहालय
(२) बालाजीनगर
(३) अहिल्यादेवी चौक
(४) यशवंतराव चव्हाणनगर कमान
(५) पद्मावती
(६) डी मार्ट
(७) नातूबाग
(८) अरणेश्वर
(९) सिटी प्राईड
(१०) पंचमी
(११) होलगा चौक, लक्ष्मीनारायण.