Pune Traffic: प्राणप्रतिष्ठापना सोहळा, गणेशमूर्ती खरेदीनिमित्त वाहतुकीत मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:39 IST2025-08-26T10:39:00+5:302025-08-26T10:39:25+5:30
Pune Traffic Advisory News: डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

Pune Traffic: प्राणप्रतिष्ठापना सोहळा, गणेशमूर्ती खरेदीनिमित्त वाहतुकीत मोठा बदल
पुणे : प्राणप्रतिष्ठापना सोहळा, तसेच शिवाजीनगर भागातील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल थाटले आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (दि. २६) आणि बुधवारी (दि. २७) बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या मार्गाने जावे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे. सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधन भेळ सेंटर
(सिंहगड रोड) परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि. २७) मध्य भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहसमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २६) या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने जाणार आहे.
पीएमपी बस मार्गात बदल...
शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता,डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.
मूर्ती खरेदीसाठी पार्किंग व्यवस्था...
- कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा
- कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा
- संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा
- टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता
- मंडईतील वाहनतळ
- छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक
उत्सवाच्या काळात मध्य भागात येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा. शक्यतो कार मध्य भागात आणू नयेत. विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहनचालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. उत्सवाच्या काळात मध्यभागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. - हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा