पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पुणे महापालिका पाण्याचा जादा वापर करत आहे. त्यामुळे जल संपत्ती नियामक आयोगाच्या आदेशानुसार पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडकवासला येथील पालिकेचे पाणी उपशाचे पंप हाऊस (जॅकवेल) पाटबंधारे विभागाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत आहे. शहराचे पाणी कमी करून १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने ठेवला होता. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अभियंता पालिकेत आले होते. पण या मागणीवरून पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी भेट नाकारून पाणी कपातीचा प्रस्तावही फेटाळला आहे.
पुणे महापालिका हद्दीसाठी खडकवासला प्रकल्पातून ११.६ टीएमसी, पवना नदीपात्रातून ०.३४ टीएमसी, भामा आसखेड प्रकल्पातून २.६७ टीएमसी आणि समाविष्ट गावासाठी १.७५ टीएमसी, अशाप्रकारे १६.३६ टीएमसी पाणी मंजूर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण हे भविष्यकालीन लोकसंख्येसाठी मंजूर केले आहे. शहरातील लोकसंख्या वाढीची माहिती लक्षात घेऊन महापालिकेस ७६ लाख १६ हजार लोकसंख्येसाठी २०३१ पर्यंत १४.६१ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पालिकेचा पाणी वापर त्यापेक्षा अधिक आहे. पालिकेने शहरासाठी २०२१ मध्ये २२.१९ टीएमसी, २०२२ मध्ये २२.७१ टीएमसी, २०२३ मध्ये २२.७७ टीएमसी, २०२४ मध्ये २०.९९ टीएमसी, तर २०२४-२५ मध्ये २२.१ टीएमसी पाणी वापरले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य जल संपत्ती नियामक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत महापालिका पाणी वापर नियंत्रित करणार नसेल तर खडकवासला येथील जॅकवेलचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे देण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र, पालिकेने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभाग सातत्याने पालिकेस पत्रही पाठवत आहे. त्यानुसार पाटबंधारे विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक होणार होती. पण पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याला भेट नाकारली आहे.
पाणी कपातीचा घाट
शहरात जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला प्रकल्पातून आतापर्यंत मुठा नदीत २५ टीएमसी पाणी सोडले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असताना पाटबंधारे विभागाने १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. धरणातून २५ टीएमसी पाणी नदीत सोडले असताना पाटबंधारे विभागाचा पाणी कपातीचा घाट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुरवठ्यात कपात नको
पुणे शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु सध्या शहराला होत असलेला पाणीपुरवठा हाच अपुरा आहे. त्यामुळे पाणी कपात नको, अशी मागणी प्रणव रवींद्र धंगेकर यांनी केली.