दक्षिण पुण्यावरची पाणीकपात अखेर दुसऱ्या दिवशीच पालिका प्रशासनाने घेतली मागे
By राजू हिंगे | Updated: May 6, 2025 20:41 IST2025-05-06T20:40:07+5:302025-05-06T20:41:50+5:30
पुणे : दक्षिण पुण्यावर आठवड्यातून एक दिवस लादण्यात आलेली पाणीकपात अखेर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने मागे घेतली आहे. बुधवारपासून या ...

दक्षिण पुण्यावरची पाणीकपात अखेर दुसऱ्या दिवशीच पालिका प्रशासनाने घेतली मागे
पुणे : दक्षिण पुण्यावर आठवड्यातून एक दिवस लादण्यात आलेली पाणीकपात अखेर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने मागे घेतली आहे. बुधवारपासून या परिसरात नियमित पाणीपुरवठा होणार आहे. पाणीकपातीला नागरिकांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती. आताही पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव आणि वितरणातील त्रुटींमुळे दक्षिण पुण्यात पाणीकपात लागू केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून पाणीकपातीस विरोध होत आहे.
एक दिवस पाणी बंद ठेवण्यात आल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे पाणीकपातीला विरोध होत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर यांनीही हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या सिंहगड रस्ता व सातारा रस्त्यावरील भागात चक्राकार पद्धतीने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती.
धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बुद्रुक आदी परिसरामध्ये हा निर्णय लागू होता. पाणीकपातीनंतर दक्षिण पुण्यातील काही भागातून तक्रारी आल्या होत्या. पाणीकपातीला विरोध होत होता. त्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून उपलब्ध पाणीसाठा आणि पावसाळ्याचा कालावधी यासह परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.