शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:48 IST2025-03-16T12:47:28+5:302025-03-16T12:48:04+5:30

- आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे

pune the most serious challenge for the city is the drug problem Madhav Bhandari | शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

पुणे बदल हा काळानुरूप होतच असतो. १०० वर्षांपूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे हे बदललेले दिसणारच. बदल होणे यात गैर काही नाही. कधी बदल आपल्या मनासारखा होतो, तर कधी होत नाही. आज शहरासाठी बोलायचे झाले तर सगळ्यात गंभीर आव्हान म्हणजे मादक द्रव्यांचा पडलेला विळखा, हे आहे. आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.

वेध अस्वस्थ मनाचा, आपण अनुभवलेले पुणे-महाराष्ट्र? आणि मरणावस्थेत, हरवत चाललेले पुणे-महाराष्ट्र या विषयावर शनिवारी (दि. १५) आयाेजिलेल्या चर्चासत्रात ते बाेलत हाेते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे आणि गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पराग ठाकूर, शिरीष मोहिते आणि उदय जगताप यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

भांडारी म्हणाले की, भारतीय संस्कृती, वातावरण आज बदलत चालले आहे. एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या मुला-मुलीच्या लग्नाला जायचे की नाही, असा प्रश्न पडतो. शहरात प्रामुख्याने उत्तर भारतीय मुले-मुली शिकण्यासाठी विविध खासगी महाविद्यालयांत येतात. त्यांना शिक्षण सोडून आई-बापाच्या पैशांवर मजा करायची असते. या वर्गामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यावर उपाय म्हणून शहरातील खासगी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना एकत्र आणून चर्चा घडवणे गरजेचे आहे.

अंकुश काकडे म्हणाले की, आपण एखाद्या गावाचा, शहराचा विकास खूप मोठा झाला की आनंदी, समाधानी असतो; पण पुणेकर समाधानी आहेत का? असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केला. पूर्वी आम्ही रस्त्यावर कबड्डी खेळायचो, घरासमोर ओट्यावर बसायचो. आता घरातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडण्यासाठी १० मिनिटे लागतात, अशी आपली दुरवस्था झाली आहे. याला कोणती एक सरकारी यंत्रणा जबाबदार नाही, तर आपण सगळे दोषी आहोत.

उपायुक्त गिल म्हणाले की, आज अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. मुलाच्या दप्तरात कोयता सापडतो त्यावेळी त्याचे दप्तर तपासायचे कुणी पालकांनी, शिक्षकांनी की पोलिसांनी? हे महत्त्वाचे आहे. आई ओरडली म्हणून मुले घर सोडून जातात, याचे कारण पिढीतील अंतर हे आहे. यासाठी पालकांनी मुलांचे चांगले मित्र बनणे गरजेचे आहे. पाल्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुलाची संगत कुणाशी आहे. याची माहिती घेणे गरजेचे आहे. शहरातील श्रीमंतांनी एकत्र येऊन गरिबांसाठी त्यांच्या मुलांसाठी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले की, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरून आलेले लोक कारणीभूत आहे. गणेश शिंदे म्हणाले की, वक्त्यांमध्येदेखील स्पर्धा लागली आहे. ते मुळात स्वत:पासून सुधारणा करण्याची गरज आहे. इतिहासाकडे बघताना त्यांनी, ज्याप्रमाणे चारचाकी वाहनात समोर बघण्यासाठी मोठी काच असते आणि मागे बघण्यासाठी छोटा आरसा असतो त्याप्रमाणे छोट्या आरशात दिसेल तेवढेच इतिहासाकडे बघितले पाहिजे.

Web Title: pune the most serious challenge for the city is the drug problem Madhav Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.