Pune Crime News Today: पुण्यातील उच्चभ्रू भागांत स्पा सेंटरच्या आड देह व्यापार चालवणाऱ्या रॅकेटवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाणेर आणि विमानतळ परिसरात पोलिसांनी छापे टाकून एकूण १८ मुलींची सुटका केली आहे. यामध्ये १० हून अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या साखळीचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विमानतळ परिसरात असलेल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून १६ मुलींची सुटका केली. यामध्ये १० परदेशी मुलींचा समावेश असून उर्वरित ६ भारतीय मुली आहेत. स्पा सेंटरचा मालक, मॅनेजर आणि जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. हे स्पा बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसायासाठी वापरले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बाणेरमध्येही कारवाई
दुसऱ्या कारवाईत, बाणेर परिसरातील एका उच्चभ्रू स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. येथे २ मुलींची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरचे मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, ग्राहकांकडून ‘मसाज’च्या नावाखाली मोठ्या रकमांची वसुली करून देह व्यापार केला जात होता.
गुन्हे दाखल, तपास सुरू
या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाणे आणि बाणेर पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून स्पा सेंटरच्या आर्थिक व्यवहारांची, परदेशी मुली भारतात कशा आल्या याची आणि संपूर्ण रॅकेटच्या सूत्रधारांची सखोल चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर स्पा सेंटरविरुद्ध कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद स्पॉट्सबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.