Pune: शेजाऱ्याशी प्रेमसंबंध, पण पतीचा अडसर; मोहिनीने प्लॅन रचला अन्...; पुणे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 00:25 IST2024-12-26T00:23:14+5:302024-12-26T00:25:01+5:30
Pune Crime News: मागील काही दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर बुधवारी अखेर या प्रकरणाचे गूढ उकलले आणि पोलिसांनी मोहिनी वाघ हिला बेड्या ठोकल्या.

Pune: शेजाऱ्याशी प्रेमसंबंध, पण पतीचा अडसर; मोहिनीने प्लॅन रचला अन्...; पुणे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती
Pune Satish Wagh Murder: भाजपचे विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ अखेर उकलले असून सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालं आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीतून मोहिनी वाघ हिनेच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या पतीला संपवल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. तसंच प्रेमप्रकरणातून मोहिनी वाघ हिने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.
मोहिनी वाघ हिचे शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात अडसर होत असल्याने तिने सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी तिने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन पती सतीश वाघ यांची हत्या केली. मागील काही दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर बुधवारी अखेर या प्रकरणाचे गूढ उकलले आणि पोलिसांनी मोहिनी वाघ हिला बेड्या ठोकल्या.
नेमकं काय घडलं होतं?
आरोपींनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर, दहा ते पंधरा मिनिटांत अपहरणकर्त्यांनी गाडीतच त्यांचा खून केला. त्यानंतर, वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपींनी पळ काढला होता. सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला जात होते. सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केले होते. या प्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सतीश वाघ यांच्या अपहरणाची बातमी मिळताच, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी त्यांचा गाडीत खून केला. वाघ यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून, लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकून पळ काढला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता.