VIDEO : टॅक्स भरूनही खड्ड्यांतून प्रवास...! पुणेकरांचा महापालिकेला संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:31 IST2026-02-07T12:30:41+5:302026-02-07T12:31:21+5:30
- मुंढवा–हडपसर मार्गाची दुरवस्था कायम; ‘ग्रँड टूर’साठी गुळगुळीत रस्ते, पण नागरिकांसाठी खड्ड्यांचा त्रास

VIDEO : टॅक्स भरूनही खड्ड्यांतून प्रवास...! पुणेकरांचा महापालिकेला संतप्त सवाल
पुणे: मुंढवा–हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या चार महिन्यांपासून अपूर्ण कामांमुळे अत्यंत धोकादायक बनला असून स्थानिकांनी त्याला “मृत्यूचा सापळा” अशी उपमा दिली आहे. दररोज हजारो नागरिक आणि प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात; मात्र मोठमोठे खड्डे, अर्धवट दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या नागरिकाने पुणे महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप करत, दिवाळीपासून सुरू असलेली दुरुस्ती अजूनही पूर्ण न झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी, धोकादायक रस्ते आणि खराब पृष्ठभागाचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, महापालिका कराच्या माध्यमातून मोठा महसूल गोळा करते; मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. “शहरात मोठ्या क्रीडा स्पर्धा आणि मॅरेथॉन आयोजित केल्या जातात, पण दैनंदिन वापराचे रस्ते सुरक्षित नसतील तर विकासाचा फायदा नेमका कुणाला?” असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ही रस्ता नाही, तर मृत्यूचा सापळा आहे.#Pune मधील मुंढवा–हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत भीषण आहे. नागरिकांचे जीव धोक्यात आहेत.
— Abhijit Deshmukh (@iabhijitdesh) February 7, 2026
शून्य सुरक्षा. शून्य जबाबदारी.@PMCPune — ही पूर्णपणे लाजिरवाणी बाब आहे.
तातडीने कारवाई करा @CMOMaharashtra 🚨 pic.twitter.com/fw5TwAkn5J
दरम्यान, ‘बजाज ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी शहरातील काही रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुळगुळीत करण्यात आले होते. त्या वेळी पुणेकरांनी या कामाचे स्वागत केले; मात्र स्पर्धा संपताच अनेक भागांतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे “विशेष कार्यक्रमांसाठी झटपट कामे आणि सामान्य नागरिकांसाठी दुर्लक्ष” अशी टीका होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुंढवा–हडपसर मार्गावरील कामे पूर्ण करावीत, ड्रेनेज झाकणांची उंचसखलता दुरुस्त करावी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महापालिका यावर काय पावले उचलणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.