पुणेकरांनी भरला ५५८ कोटी ४६ लाखांचा मिळकत कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:58 IST2020-06-26T19:58:01+5:302020-06-26T19:58:09+5:30
लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या पुणे महापालिकेला दिलासा..

पुणेकरांनी भरला ५५८ कोटी ४६ लाखांचा मिळकत कर
पुणे : महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ४ लाख ४१ हजार ६२१ मिळकतधारकांनी आतापर्यंत ५५८ कोटी ४६ लाखांचा मिळकत कर भरला आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लॉक डाऊन असूनही आॅनलाईन पध्दतीने अधिक मिळकत कर जमा झाला आहे.
पालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १० लाख ५७ हजार ७१६ आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ हजार ५११ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळकतकरामधून अपेक्षित आहे. यामध्ये जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या ९ लाख १३ हजार ८५५ आहे. या मिळकतींमधून १ हजार ३६५ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच नवीन समाविष्ट ११ गावांमधील १ लाख ४३ हजार ८६१ मिळकतींमधून १४६ कोटी ५१ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी मालमत्ता कराची देयके आॅनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
साधारणपणे १ एप्रिल ते २६ मे या कालावधीत ४ लाख ४१ हजार ६२१ मिळकतधारकांनी ५५८ कोटी ४६ लाख मिळकत कर जमा केला आहे. यामधील ३ लाख ६१ हजार ९०५ नागरिकांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे ४२१ कोटी २३ लाखांचा कर भरला आहे. जमा झालेल्या करापैकी हे प्रमाण ८५ टक्के आहे. यासोबतच ३९ हजार २५० मिळकतधारकांनी १०५ कोटी ६० लाखांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे. तर ४० हजार ४९४ मिळकतधारकांनी ३१ कोटी ७७ लाखांचा कर रोखीने भरला आहे. पालिकेने सुरु केलेल्या सुविधा केंद्रांवर ११ मेपासून ते २६ जूनपर्यंत ४७ दिवसांमध्ये ७२ हजार ८६६ मिळकतधारकांनी १२६ कोटी ६९ लाखांचा मिळकत कर धनादेश आणि रोख स्वरुपात जमा केलेला आहे.
=====
महापालिकेने कर भरणा करण्यासाठीची मुदत एक महिना वाढविली होती. ही मुदत ३० जून रोजी संपत असल्याने शेवटच्या चार दिवसात नागरिकांनी कर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी आॅनलाईन पद्धतीचा वापर करावा तसेच पालिकेच्या सुविधा केंद्रांवर सुरक्षित अंतर राखत कर जमा करावा. २७ व २८ जून रोजी शनिवार व रविवारी सुट्टी असली तरी नागरी सुविधा केंद्र सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे विभागप्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.