'गोविंदा रे गोपाळा'चा जयघोष..! पुणेकरांनी जल्लोषात अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:33 IST2025-08-17T13:17:45+5:302025-08-17T13:33:08+5:30

पुनीत बालन ग्रुपचा संयुक्त उपक्रम; ऐतिहासिक लाल महाल चौकात जनसागर

Pune residents experience the thrill of DJ-free Dahi Handi with joy | 'गोविंदा रे गोपाळा'चा जयघोष..! पुणेकरांनी जल्लोषात अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

'गोविंदा रे गोपाळा'चा जयघोष..! पुणेकरांनी जल्लोषात अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

पुणे : 'गोविंदा रे गोपाळा'चा जयघोष... ढोल-ताशांचा मंगलमय गजर... महाकाल नृत्य आणि पारंपरिक संगीतावर थिरकलेली तरुणाई... अशा उत्साही वातावरणात 'पुनीत बालन ग्रुप' सह २६ सार्वजनिक मंडळांतर्फे आयोजित संयुक्त डीजेमुक्त दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला. यात पुणेकरांनी पारंपरिक वाद्य, नृत्यांसह मानवी मनोऱ्यांचा थरारक अनुभव घेतला.

ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर 'राधेकृष्ण ग्रुप'ने सात थर रचत रात्री ९:४५ वाजता ही संयुक्त दहीहंडी फोडली. राज्यातील पहिली डीजेमुक्त दहिहंडी उत्सव साजरा करत एक नवा आदर्श 'पुनीत बालन ग्रुप'ने मांडला. शहरात यंदा डीजेमुक्त आणि संयुक्त दहीहंडी साजरी करण्याची घोषणा पुनीत बालन यांनी केली होती. त्याला पुणेकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा गजर आणि 'वरळी बिट्स'ने वाजविलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजेमुक्त दहीहंडीचा प्रयोग यशस्वी करत एक नवीन पायंडा पाडला. प्रभात बॅण्डच्या सुमधुर वादनाने या दहीहंडी उत्सवाची सुरवात झाली. युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा या ढोल पथकांच्या जोरदार वादनाने रंगत वाढविली आणि 'वरली बिट्स'च्या बॅण्डने केलेल्या वादनाने अवघे वातावरण दणाणून सोडले.

अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता हार्दिक जोशी, मराठी बिग बॉस फेम इरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी यावेळी हजेरी लावली. दहीहंडीच्या सलामीकरिता वंदे मातरम् दहीहंडी संघ, नटराज संघ, म्हसोबा संघ, भोईराज संघ, गणेश मित्रमंडळ संघ, गणेश महिला गोविंदा पथक, गणेश तोफखाना दहीहंडी संघ, नवज्योत ग्रुप संघ, इंद्रेश्वर संघ (इंदापूर), शिवकन्या गोविंदा पथक (चेंबुर-मुंबई), शिवतेज ग्रुप दहीहंडी संघ आदी गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. यंदा उज्जैन येथील पारंपरिक 'शिव महाकाल' पथकाच्या तालावर नाचत तरुणाईने जल्लोष केला.

पुणेकरांनी यंदाच्या डीजेमुक्त दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गतवर्षी आम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांचा संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला होता. यंदाच्या वर्षी डीजेचा वापर टाळण्यात आला. त्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी झाले आणि पारंपरिक वाद्याच्या वादकांनाही रोजगार मिळाला. - पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप/विश्वस्त, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

Web Title: Pune residents experience the thrill of DJ-free Dahi Handi with joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.