पुणे : पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी (३१ जानेवारी) भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना रंगणार आहे. पण हा आंतरराष्ट्रीय सामना पुण्यात असूनही बहुतांश पुणेकरांना तो पाहता येणार नाही. कारण हजारो क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची तिकिटेच मिळाली नाहीत. ‘बुक माय शो’च्या माध्यमातून ९९ टक्के तिकीट विक्री झाल्याचा दावा एमसीएकडून करण्यात आला आहे.
भारत-इंग्लंड सामन्याची तिकीटविक्री कधीपासून सुरू झाली, कधी संपली याची कोणतीही माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांना हा सामना पाहायचा आहे, पैसे देण्याचीही त्यांची तयारी आहे पण तिकिटे उपलब्ध नाहीत असे चित्र आहे.
एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ म्हणाले की, एमसीए स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३० हजार आहे. ही क्षमता वाढवणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांना तिकिटे मिळण्यात अडचणी येत आहेत.
पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक बापू हजारे म्हणाले की, क्रिकेट सामना पुण्यात असूनही आम्हाला तो पाहता येत नाही. स्थानिकांना तिकिटे मिळत नसतील तर हा सामना पुण्यात ठेवून काय उपयोग? पैसे देण्याची तयारी असूनही तिकीट मिळत नाही. पुण्यात सातत्याने हा प्रकार घडत आहे.
तिकिटांचा स्थानिक कोटा का नाही?
क्रिकेट सामना ज्या शहरात आयोजित केला जातो तेथे तिकिटांचा स्थानिक कोटा का ठेवला जात नाही, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने पुढील सामन्यांसाठी स्थानिक कोटा ठेवण्याच्या दृष्टीने विचार केला तर येथील चाहत्यांनाही सामन्याचा आनंद लुटता येईल.
तिकिटांचा काळाबाजार
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भारत-इंग्लंड सामन्याची तिकिटे उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याचवेळी बाजारात दोन हजार पाचशे रुपयांचे तिकीट चार हजार रुपयांना विकले जात होते. अनेकांनी व्हाॅट्सॲपवर तिकिटे मिळतील असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे ऑनलाइन तिकिटे खरेदी करून त्यांचा काळाबाजार केल्याची चर्चा आहे.
एमसीएकडून तिकीट विक्री केली जात नाही. कारण आमच्याकडे तिकीट विक्री आल्यास अनेकांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही हे काम तिकीट विक्री करणाऱ्या संस्थांना दिले आहे. त्यामुळे आम्ही यामध्ये काहीही करू शकत नाही. - रोहित पवार, अध्यक्ष एमसीए