खराडी पार्टी प्रकरणात महिला आयोगाची एंट्री; मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:14 IST2025-08-05T21:14:07+5:302025-08-05T21:14:53+5:30
- संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पोलिस आयुक्तांना आदेश

खराडी पार्टी प्रकरणात महिला आयोगाची एंट्री; मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा व्यक्त केला संशय
पुणे - पुणे पोलिसांनी खराडी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून रेव्ह पार्टी करणाऱ्यांना अटक केल्याच्या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने एंट्री केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रात प्राजंल खेवलकर यांनी स्वतःच्या नावावर हॉटेलमध्ये २८ वेळा रुम बुक करून मुलींना बोलविल्याची तक्रार प्राप्त झाली असून हा प्रकार मानवी तस्करीचा असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी २७ जुलै रोजी खराडी येथे छापा टाकून एका हॉटेलमधील रेव्ह पार्टी उधळून सात जणांना अटक केली. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर यांच्यासह काही महिलांचाही समावेश आहे. अटक केलेल्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या कार्यालयास कु.सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची तक्रार प्राप्त झाली आहे. यामध्ये खेवलकर यांनी २८ वेळा स्वतःच्या नावांने हॉटेलमध्ये रुम बुक करून अनेक वेळा मुलींना बोलवल्याचे नमूद केले आहे. या अनुषंगाने महिला आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून यामागे मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
खेवलकर यांनी २८ वेळा रुम बुक करणे ही क्रिया संशयास्पद असून, हा संगठित रॅकेट असल्याचा गंभीर अंदाज आहे, महिलांना कोणत्या उद्देशाने बोलावले गेले? त्यांना फसवून किंवा दबावाखाली वापरण्यात आले होते का ?, त्या महिलांचे मूळ गाव, वय, ओळखपत्र व मेडिकल तपासणीचे अहवाल त्वरीत गोळा करुन त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, मानव तस्करीविरोधी पथक, सायबर विभाग व महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे पत्रात नमूद केले आहे.