Pune Rave Party : रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 20:25 IST2025-07-27T20:25:03+5:302025-07-27T20:25:38+5:30

- प्रांजल खेवलकरसह ५ पुरुष आणि २ महिलांना गुन्हे शाखेने केली अटक

Pune Rave Party crime news Eknath Khadse son-in-law is the organizer of a drug party in Kharadi | Pune Rave Party : रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत 

Pune Rave Party : रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत 

पुणे : शहरातील खराडी परिसरातील एका स्टे बर्ड, अझुर सूट नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी (दि. २७) पहाटे मोठी कारवाई केली. या पार्टीचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याने केली होती. त्याच्या नावे गेल्या तीन दिवसांपासून हॉटेलचे ३ फ्लॅट बुक होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या वेळी हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच, पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या वेळी घटनास्थळाच्या परिसरातून तीन महिला पसार झाल्याची माहिती आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. या वेळी रूम नं. १०२ मध्ये डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (३५, पुणे), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (४१, पुणे), सचिन सोनाजी भोंबे (४२, वाघोली, पुणे), बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (२७, रा. पुणे, आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (२२, रा. औंध, पुणे) आणि प्राची गोपाल शर्मा (२३, म्हाळुंगे, पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, १० मोबाइल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट, दारू व बीअरच्या बॉटल्स, हुक्का फ्लेवर हे अमली पदार्थ असे ४१ लाख ३५ हजार ४०० रुपयांचे पदार्थ व साहित्य जप्त केले.



सातही आरोपींविरोधात खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, शैलेश संखे, उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्यासह पथकाने केली. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. खेवलकर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे.

Web Title: Pune Rave Party crime news Eknath Khadse son-in-law is the organizer of a drug party in Kharadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.