Pune Rain : शहरात अवकाळी पावसाच्या सुखद सरी ;पुणेकरांना असहय उकाड्यापासून दिलासा
By नम्रता फडणीस | Updated: May 9, 2025 20:34 IST2025-05-09T20:30:36+5:302025-05-09T20:34:28+5:30
हडपसर मध्ये सर्वाधिक १७. ५ मिमी पावसाची नोंद

Pune Rain : शहरात अवकाळी पावसाच्या सुखद सरी ;पुणेकरांना असहय उकाड्यापासून दिलासा
पुणे : शहरात शुक्रवारी ( दि.९) सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. अडीच वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरींमुळे पुणेकरांना असहय उकाड्यापासून दिलासा मिळाला. हडपसर येथे सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुण्यात कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या आसपास होता. अंगाची लाही लाही करणा-या असहाय उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. त्यामुळे शुक्रवारी पावसाच्या सरींनी शहरातील वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. हडपसर, शिवाजीनगर, कात्रज, कोरेगाव पार्क, सिंहगड रस्ता ,पाषाण यांसह उपनगरांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरींमध्ये भिजण्याचा आंनद पुणेकरांनी लुटला.
काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाण पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक काहीशी मंदावली होती. उपनगराच्या काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसापासून शहराच्या वाढलेल्या कमाल तापमानात पाच अंश सेल्सिअसने घट झाली. दि. १४ मे पर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, शहराच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्यात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिमी) -
हडपसर १७. ५,
पाषाण १७,
शिवाजीनगर ११. २,
मगरपट्टा १