पुणे : मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मंगळवारी मुंबईहून सुटणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगतीसह पाच ते सहा प्रमुख रेल्वे गाड्या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या पुण्याकडे न आल्यामुळे बुधवारी या गाड्या रद्द करण्यात आला आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई परिसर आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुपारनंतर लोकल व एक्स्प्रेस रेल्वे सेवा रद्द केली. मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मुंबई- पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. शिवाय, रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या पुण्यात शॉर्ट टर्मिनेट केल्या. यामध्ये कोयना आणि उद्यान या दोन गाड्यांचा समावेश होता. काही गाड्या पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या. बुधवारी सकाळी नियोजित वेळी उद्यान आणि कोयना पुण्यातून पुढे धावणार आहेत.
डेक्कन, प्रगतीचा मुंबईत थांबा :
मंगळवारी सकाळी डेक्कन क्वीन, प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटीकडे नियोजित वेळी निघाल्या. परंतु मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे निश्चित स्थळी पोहोचण्यास उशीर झाला. तसेच संध्याकाळी पुण्याला येणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी सकाळी या गाड्या पुण्यातून रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणे-मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
एसटी बस दोन तास उशिराने :
पुणे व परिसरात सुरू असलेल्या पावसाचा फटका एसटीच्या वेळापत्रकावर झाला. दरम्यान पुणे-मुंबई, पुणे - छत्रपती संभाजीनगर, पुणे - सोलापूर आणि पुणे - कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या ई-शिवनेरी बस दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बसस्थानकामध्ये ताटकळत थांबावे लागले. पुण्यातून नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या मार्गांवर धावणाऱ्या इतर बसगाड्यांनादेखील वाहतूककोंडी आणि पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. एसटीला उशीर झाल्याने प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी खासगी गाड्यांचा आधार घेतला. परंतु जास्तीचे तिकीट दर आकारण्यात आले. शिवाय, पावसामुळे रस्त्यात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली होती. तर, काही ठिकाणी वाहतूककोंडीमुळे या बसला उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.