भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस; डिंभे, चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:20 IST2025-08-20T20:19:57+5:302025-08-20T20:20:47+5:30
डिंभे धरणातून २१ हजार क्युसेक आणि चासकमान धरणातून २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड आणि भीमा नदीत सोडण्यात आला आहे.

भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस; डिंभे, चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग
भीमाशंकर : भीमाशंकर परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, येथे ३४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे डिंभे आणि चासकमान धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी, डिंभे धरणातून २१ हजार क्युसेक आणि चासकमान धरणातून २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड आणि भीमा नदीत सोडण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातही पावसाचा जोर कायम आहे. आहुपे येथे ३२७, राजपूर येथे २८२, आसाणे येथे २६२, डिंभे धरण परिसरात ९९ आणि घोडेगाव येथे ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांना प्रचंड पूर आला असून, भीमा आणि घोड नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून आणखी जास्त पाण्याचा विसर्ग सोडावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.