Pune Rain : शहरात मोडला १० वर्षांचा विक्रम, एनडीए परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:09 IST2025-05-23T14:07:13+5:302025-05-23T14:09:37+5:30
- जिल्ह्यात तब्बल साडेचारपट पाऊस, पिकांना फटका

Pune Rain : शहरात मोडला १० वर्षांचा विक्रम, एनडीए परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद
पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला असून, जिल्ह्यात मे महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल साडेचारपट पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी २२.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खरिपाच्या तयारीसाठी करण्यात येणाऱ्या मशागतीची कामे देखील खोळंबली आहेत. दरम्यान, मे महिन्यात शहरात ३३ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा पावसाने गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. शहरात २०१५ मध्ये सर्वाधिक १०२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर आता बुधवारी (दि. २१) एनडीए परिसरात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शहर व जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी २२.५ मिलिमीटर पावसाची नोंद केली जाते. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत नऊ दिवस पावसाची नोंद करण्यात आली असून, सरासरी १०४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या तुलनेत ४६२.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १५५.२ मिलिमीटर पाऊस खेड तालुक्यात झाला असून त्याखालोखाल मावळ तालुक्यात १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वांत कमी पाऊस वेल्हा तालुक्यात ६४ व इंदापूर तालुक्यात ७३ मिलिमीटर झाला आहे. पुणे शहराची मे महिन्याची सरासरी ३३.१ मिलिमीटर इतकी आहे. यंदा आतापर्यंत शहरात शिवाजीनगर येथे ११६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सरासरीच्या तुलनेत याची टक्केवारी तब्बल ३५१.७ इतकी आहे. हवेली तालुक्यात ९.७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. हडपसर, मगरपट्टा या भागांत गेल्या तीन दिवसांत तुफान पाऊस झाल्याने हवेली तालुक्यात एकूण ११९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १ हजार २३५ टक्के इतका झाला आहे. शहरात यंदा एका दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. शहरात १४ मे २०१५ रोजी सर्वाधिक १०२.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर आता बुधवारी (दि. २१) एनडीए परिसरात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात खरिपाच्या मशागतीची कामे केली जातात. शेतीची नांगरणी करून काही दिवस उन्हामध्ये जमिनीला तापत ठेवून विश्रांती दिली जाते. यंदा मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना नांगरणी करण्यास पावसाने उसंत दिलेली नाही. नांगरणीसह खत टाकणे, जमिनीला विश्रांती देणे यासाठी कोरडे उष्ण हवामान आवश्यक असते. यामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. मात्र, सततच्या पावसामुळे ही प्रक्रिया खोळंबली आहे. जिल्ह्यात सध्या उन्हाळी कांदा पिकाची काढणे सुरू असून बाजरी पीकही काढण्याच्या अवस्थेत आहे. या पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील कांदा व बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा काढून ठेवल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सूर्यप्रकाश नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील चिंतेत असून ऑक्टोबर छाटणीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, तसेच आंबेगाव तालुक्यातील काही भागांत भात लागवड केली जाते. यासाठी सध्या भात रोपे टाकण्यासाठी रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, या पावसामुळे जमिनीची मशागत करणे शक्य झालेले नाही. रोपे टाकण्यापूर्वी जमीन भाजावी लागते. ते न झाल्याने शेतकऱ्यांनी अजूनही रोपवाटिका तयार केलेल्या नाहीत. त्यामुळे भात रोपे यंदा उशिरा उपलब्ध होऊन त्याचा परिणाम लागवडीवर होणार आहे. उन्हाळ्यात शेतीची मशागत झाल्यावर कडक होण्यात उन्हात जमीन तापविले जाते. यामुळे कीड व रोगांचे समूह समूळ उच्चाटन करणे शक्य होते. तसेच मातीचा पोत सुधारून खाते टाकल्यामुळे उत्पादकताही वाढते. ही कामे पावसामुळे होऊ शकलेली नाहीत. या पावसामुळे मात्र बारमाही फळपिकांना काहीसा फायदा झाला आहे.
या पावसामुळे उन्हाळी बाजरी कांदा या पिकांना फटका बसला आहे. शेतीची मशागतीची कामेदेखील खोळंबली आहेत. मात्र, मान्सून वेळेत येईल असे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पेरण्या वेळेत झाल्यास एकंदरीत खरिपावर त्याचा चांगला परिणाम होईल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
तालुका सरासरी पाऊस प्रत्यक्ष (मिमी) टक्के
पुणे शहर--३३.१--११६.४--३५१.७
हवेली ९.७--११९.८--१२३५.१
मुळशी २०.१--९३.३--४६४.२
भोर २२.३--८१.९--३६७.३
मावळ १३.२--१३३--१००७.६
वेल्हा २२--६४.१--२९५.१
जुन्नर १०.३--९२.६--८९९
खेड २८.९--१५५.२--५३७
आंबेगाव १५.३--९४.८--६१९.६
शिरूर १७.८--१०६.५--५९८.३
बारामती २३.८--८१.९--३४४.१
इंदापूर २०.९--७३--३४९.३
दौंड २०.९--१०५.८--५०६.२
पुंरदर २३.४--१००.६--४२९.९
सरासरी २२.५--१०४--४६२.२